Join us

तीन दिवसात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 9.6 लाख कोटी 'स्वाहा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 2:24 PM

अर्थसंकल्प सादर होण्याआधी रोज नवनवीन उच्चांक नोंदवत असलेला शेअर बाजार आता त्याच वेगाने लोळण घेत आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून गंटागळया खाणारा शेअर बाजार अद्याप सावरलेला नाही.

ठळक मुद्देसकाळी 1,274 अंकांची घसरण झाल्यामुळे सेन्सेक्स दीड महिन्यांपूर्वीच्या 33,482 या निचांकी पातळीला पोहोचला. सोमवारी अमेरिकन भांडवली बाजारातील डाऊ जोन्सचा औद्योगिक निर्देशांक 1,175.21 अंकांनी घसरला.

मुंबई - अर्थसंकल्प सादर होण्याआधी रोज नवनवीन उच्चांक नोंदवत असलेला शेअर बाजार आता त्याच वेगाने लोळण घेत आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून गंटागळया खाणारा शेअर बाजार अद्याप सावरलेला नाही. आज तर शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली. सकाळी बाजार उघडण्यापूर्वी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी तर निफ्टी 300 अंकांनी खाली कोसळला. मागच्या तीन दिवसात शेअर बाजारात जी घसरण झालीय त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 9.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

सकाळी 1,274 अंकांची घसरण झाल्यामुळे सेन्सेक्स दीड महिन्यांपूर्वीच्या 33,482 या निचांकी पातळीला पोहोचला, तर निफ्टीचीही 10,276.30 च्या पातळीपर्यंत घसरण झाली. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 30 शेअर्सच्या इंडेक्समध्ये 2,164.11 अंकांची घसरण झाली आहे. शेअर बाजारात शेअर्सची जी विक्री सुरु आहे त्यामुळे बीएसई नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारमुल्यामध्ये 9 लाख 60 हजार 938 कोटींची घट झाली आहे. 

बाजरातील या पडझडीबद्दल बोलताना अर्थ आणि महसूल सचिव हसमुख अधिया म्हणाले कि, बाजाराची स्थिती सुधारण्यासाठी सरकार यामध्ये लक्ष घालेल. दीर्घकालिन भांडवली नफ्यावर कर याशिवाय म्युच्युअल फंडाच्या लाभांशावरही कर रद्द करणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले कि, जागतिक शेअर बाजारातील घसरणीचे हे पडसाद आहेत. पण काय करता येऊ शकते त्यामध्ये सरकार लक्ष घालेल असे ते म्हणाले. 

 सोमवारी अमेरिकन भांडवली बाजारातील डाऊ जोन्सचा औद्योगिक निर्देशांक 1,175.21 अंकांनी घसरला. त्यामुळे डाऊ जोन्समध्ये 1600 अंकांची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. यामुळे भारतीय बाजारातील धास्तावलेल्या गुंतवणुकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला. परिणाम सेन्सेक्स तब्बल 2.89 टक्के तर निफ्टी 3.48 टक्क्यांनी खाली आला. 

आशियाई भांडवली बाजारही चांगलेच गडगडले. 2011 नंतर आशियाई बाजारात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. जगभरातील शेअर बाजारांसाठी आजचा दिवस काळा ठरत आहे. जपानचा निक्केई हा निर्देशांक 4.6 टक्क्यांनी कोसळला. ऑस्ट्रेलियाचे शेअर तीन टक्क्यांनी घसरले तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली.  

टॅग्स :शेअर बाजार