प्रसाद गो. जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला असला तरी आगामी सप्ताहात बाजाराला दिशा देण्याचे कार्य युरोप आणि जपानचे व्याजदरच करतील, असा रंग दिसतो आहे. याशिवाय विविध कंपन्यांचे तिमाही निकाल, परकीय वित्तसंस्थांची भूमिका, जागतिक बाजारातील वातावरण आणि खनिज तेलाचे दर हे प्रमुख घटक बाजाराची दिशा ठरविणारे आहेत.
गतसप्ताहामध्ये सेन्सेक्स (बंद मूल्य ५३,७६०.७८) आणि निफ्टी (बंद मूल्य १६,०४९.२०) मध्ये सुमारे १ टक्का घट झाली आहे. मात्र त्याचवेळी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या दोन्ही निर्देशांकांमध्ये अनुक्रमे अर्धा आणि एका टक्क्याने वाढ झाली. याचाच अर्थ गुंतवणूकदार आता निवडक समभागांमध्ये गुंतवणूक करू लागल्याचे स्पष्ट होत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून ७४३२ कोटी रुपये काढून घेतले आहेत.
मिडकॅप, स्मॉलकॅपने दिला फायदा
- गतसप्ताहात बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये एक टक्क्याहून अधिक घट झाली असली तरी बाजाराच्या भांडवलमूल्यामध्ये मात्र वाढ झाली आहे.
- आधीच्या सप्ताहाच्या अखेर बाजाराचे एकूण भांडवलमूल्य २,५१,५९.९९८.८० कोटी रुपये होते. ते या सप्ताहाच्या अखेरीस २,५१,९५,४७२.७२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
- याचाच अर्थ सप्ताहामध्ये गुंतवणूकदार ३५,४७३.९२ कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत.
- सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जरी घट झाली असली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये वाढ झाल्यामुळेच गुंतवणूकदारांचे भांडवल वाढलेले आहे.