लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: म्युच्युअल फंडांतील हायब्रीड फंडांकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत असून, या फंडांत गुंतवणकदारांनी नोव्हेंबरमध्ये तब्बल ४,१२९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
सुत्रांनी सांगितले की, वर्ष २०२४मध्ये शेअर बाजार सार्वकालिक उच्चांकावर पोहोचलेला असतानाच मागील २ महिन्यांपासून बाजारात घसरण होत आहे. याही परिस्थिती हायब्रीड फंडात मात्र भरभरून गुंतवणूक होताना दिसत आहे. हायब्रीड फंडांतील व्यवस्थापनाधीन संपत्ती (एयूएम) १ वर्षात ४५ टक्के वाढली आहे. यावरून हे फंड किती लोकप्रिय झाले आहेत, याची कल्पना येते. बाजारातील चढ उतारावर हायब्रीड फंडांनी मात केली आहे.
'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया'च्या (अॅम्फी) अहवालानुसार, मागील १ वर्षात हायब्रीड फंडांची एयूएम वाढून ८.७७ लाख कोटी रुपये झाली.
हायब्रीड फंड का होताहेत लोकप्रिय?
शेअर बाजारातील चढउतारांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक पर्याय हवा आहे. त्यामुळे ते हायब्रीड फंडांकडे वळले आहेत. फंडाद्वारे गुंतवणूकदार समभाग आणि डेब्ट फंड या दोन्ही पर्यायांत गुंतवणूक करू शकतात. यात कमी जोखमीसह उत्तम परतावा मिळतो.