Ion Exchange Share Price: आयन एक्स्चेंजला अदानी पॉवर (Adani Power) लिमिटेडकडून सुमारे १६१.१९ कोटी रुपयांचे कंत्राट मिळालं आहे. अदानी पॉवरकडून कंत्राट मिळाल्याच्या वृत्तानंतर आयन एक्स्चेंजच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्याचं दिसून आलं. सकाळी १० वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ९ टक्क्यांहून अधिक वाढून ७०५.९५ रुपयांवर पोहोचला होता. मात्र यानंतर त्यात थोडी घसरण दिसून आली.
कंपनीचा शेअर आज ६७० रुपयांवर उघडला. या करारामध्ये अदानी पॉवरच्या रायपूर आणि रायगड अल्ट्रा-सुपरपॉवर प्रकल्पातील दोन युनिट्ससाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉटर अँड एन्वायरमेंट मॅनेजमेंट सोल्युशन प्रदान करण्याचा समावेश आहे. बुधवारी एनएसईवर कंपनीचा शेअर १.४ टक्क्यांनी घसरून ६४७.६५ रुपयांवर बंद झाला.
"कंपनीला रायपूर आणि रायगड अल्ट्रा सुपर पॉवर प्रकल्पासाठी २*८०० मेगावॅट प्रकल्पांसाठी जवळपास १६१.१९ कोटी रुपयांचं अदानी पॉवर कडून कंत्राट मिळालं आहे," अशी माहिती कंपनीनं स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली.
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार या कंत्राटाअंतर्गत प्रक्रिया आणि उपयुक्ततेच्या गरजांसाठी पाणी तसंच पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीचं इंजिनिअरिंग, खरेदी आणि ईपीसी यांचा समावेश आहे. हे प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचं फायलिंगमध्ये नमूद करण्यात आलंय. यापूर्वी कंपनीला आफ्रिकेमध्येही एका प्रकल्पासाठी २५०.६५ कोटी रुपये (व्हॅट आणि टॅक्स सोडून) एक आंतरराष्ट्रीय कंत्राट मिळालं होतं.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)