iPhone 16 in 10 Minutes: Apple कंपनीचे आयफोन भारतीयांसाठी स्टेटस सिम्बॉल झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात भारतीय आयफोनच्या नवीन अपडेटची वाट पाहत असतात. नुकताच Apple ने आयफोन 16 लाँच केला. आजपासून तो भारतातील विविध Apple स्टोअर्समध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रत्येक Apple स्टोअर्सच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. तुम्हीही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या अशा रांगेत गर्दी करण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत आयफोन खरेदी करू शकता. ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला फक्त 10 मिनिटांत iPhone 16 ची डिलिव्हरी मिळणार आहे.
ब्लिंकिट आणि बिग बास्केटकडून ऑफरवास्तविक, क्विक कॉमर्स सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी आयफोनच्या ग्राहकांना लक्षात घेऊन क्विक डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. याआधी झोमॅटो सारख्या काही कंपन्या या क्षेत्रात काम करत आहेत. यात आता क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिट आणि टाटा ग्रुपची बिग बास्केट यांनीही उडी घेत आयफोनची काही मिनिटांत डिलिव्हरी करण्याचा विडा उचलला आहे. या सेवेत देशातील काही प्रमुख शहरात ग्राहकांना घरबसल्या १० मिनिटांत आयफोन १६ची होम डिलिव्हरी मिळणार आहे.
या शहरांमध्ये सुविधा सुरूबिग बास्केटने या सेवेत पहिलं पाऊल आज (शुक्रवार) टाकलं आहे. मुंबई, बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर येथील ग्राहक बिग बास्केटवर आयफोन 16 ऑर्डर करू शकतात. त्यांना फक्त 10 मिनिटांत आयफोन घरी मिळणार आहे. बिग बास्केटने यासाठी टाटा समूहाच्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन क्रोमासोबत भागीदारी केली आहे.
या उत्पादनांचीही जलद डिलिव्हरीया कंपन्या फक्त आयफोनचं नाही तर ग्राहक बिग बास्केटवर इतर अनेक उत्पादने देखील खरेदी करू शकतात. याचीही क्विक होम डिलिव्हरी मिळणार आहे. त्यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, प्लेस्टेशन कन्सोल, मायक्रोवेव्ह अशा अनेक उत्पादनांचा समावेश आहे. बिग बास्केट आपल्या क्विक कॉमर्स ऑफरचा सतत विस्तार करत आहे. या विस्तार योजनेचा एक भाग म्हणजे ही सेवा आता जास्तीत जास्त शहरांमध्ये मिळणार आहे.
ब्लिंकिटही मागे नाहीबिग बास्केटसोबत ब्लिंकिटने 10 मिनिटांत iPhone 16 ची डिलिव्हरीही सुरू केली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना व्हॉट्सॲप अलर्ट पाठवून याबाबत माहिती दिली आहे. ब्लिंकिटनेही आजपासून याची सुरुवात केली आहे. बिग बास्केट व्यतिरिक्त ब्लिंकिटवरुनही अवघ्या १० मिनिटांत आयफोन 16 खरेदी करू शकणार आहेत. ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर ढींढसा यांनी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर यासंदर्भात माहिती दिली आहे.
ग्राहक 21 सप्टेंबरपासून Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुनही iPhone 16 ऑर्डर करू शकतात. हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म iPhone 16 होम डिलिव्हरीसाठी 1 ते 2 दिवस घेत आहेत.