Join us

Foxconn 'या' राज्यात ८८०० कोटींची गुंतवणूक करणार, १४ हजार नवे रोजगार निर्माण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:57 PM

कंपनीनं या राज्याला दिला एका वर्षात दुसरा गुंतवणूकीचा प्रस्ताव.

आयफोन असेंबल करणारी कंपनी फॉक्सकॉन कर्नाटकमध्ये ८,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून ते सप्लीमेंट्री प्लांट उभारणार आहेत. हा प्रकल्प राज्यातील देवनहल्ली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट रिजनमध्ये (ITIR) उभारण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटकचे उद्योगमंत्री एम.बी.पाटील यांनी सांगितलं. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या संदर्भात फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेटचे (FII) मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रँड चेंग आणि इतर प्रतिनिधींसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. फॉक्सकॉनच्या सहयोगी एफआयआयनं या गुंतवणूक प्रस्तावांतर्गत ८,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं नियोजन केलं आहे. यामुळे १४००० नवे रोजगार निर्माण होणार असल्याचे पाटील म्हणाले. 

प्रकल्पासाठी सुमारे १०० एकर जमीन लागणार आहे. एफआयआय फोनसाठी आवश्यक कंपोनंट्स तयार करण्याव्यतिरिक्त स्क्रीन आणि बाहेरील कव्हरदेखील तयार करेल. हे देवनहल्ली (ITIR) येथील असेंब्ली युनिटसाठी सप्लिमेंट्री प्लांट म्हणून काम करेल. विशेष म्हणजे, कर्नाटक सरकारनं हा प्रकल्प कोणत्याही प्रकारे गमावू इच्छित नसल्याचे संकेत दिले होते.

राज्याला दिलेला दुसरा प्रस्तावफॉक्सकॉन आणि त्याच्या उपकंपन्यांनी यावर्षी कर्नाटकला दिलेला हा दुसरा गुंतवणुकीचा प्रस्ताव आहे. या वर्षी मार्चमध्ये, कंपनीने फोन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी बंगळुरू विमानतळाजवळील माहिती तंत्रज्ञान औद्योगिक क्षेत्राची निवड केली. या ठिकाणी कंपनी ८००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या युनिटच्या प्रस्तावित गुंतवणुकीसह उत्पादन युनिट एप्रिल २०२४ पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :कर्नाटकव्यवसायगुंतवणूक