Join us  

भारतात बनतोय iPhone, तरीही अमेरिका-दुबईपेक्षा जास्त आहे किंमत; पाहा काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:14 AM

iPhone चं उत्पादन भारतात होत आहे, पण असं असूनही देशात त्याची किंमत अमेरिका आणि दुबईपेक्षा जास्त आहे.

अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी ॲपलनं (Apple) iPhone 15 लॉन्च केला आहे. या फोनचं उत्पादन भारतात होत आहे, पण असं असूनही देशात त्याची किंमत अमेरिका आणि दुबईपेक्षा जास्त आहे. देशात सुरू असलेल्या उत्पादनामुळे भारतात आयफोन स्वस्तात मिळेल अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु तसं झालं नाही. भारतात तयार होत असलेल्या आयफोनची किंमत अमेरिकेच्या तुलनेत २० टक्क्यांनी जास्त आहे. दुबईमध्ये iPhone 15 ची किंमत ३,३९९ दिरहम म्हणजेच ७६,८१७ रुपये आहे. तर भारतात त्याची किंमत ७९,९०० रुपये आहे. जर आपण अमेरिकेबद्दल बोललो तर याची किंमत ७९९ डॉलर्स म्हणजेच ६६,३१७ रुपये आहे.

त्याचप्रमाणे, भारतात iPhone 15 Pro Max (एक टेराबाइट) ची किंमत १,९९,९०० रुपये आहे, जी अमेरिकेत मिळणाऱ्या याच स्पेसिफिकेशनच्या आयफोनपेक्षा तब्बल ५१ टक्के जास्त आहे. अमेरिकेत या फोनची किंमत १,५९९ डॉलर्स म्हणजेच १,३२,७१७ रुपये आहे. हे मॉडेल सध्या भारतात बनवले जात नाही. कंपनीच्या फ्लॅगशिप प्रो मॉडेलच्या किंमतीत मोठा फरक आहे. भारतात यावर २२ टक्के आयात शुल्क आकारण्यात येतंय. iPhone 15 Pro च्या बेस मॉडेलची भारतात किंमत १,३४,९०० रुपये आहे तर अमेरिकेत ती ८२,९१७ रुपये आहे. दुबईमध्ये त्याची किंमत ९७,१५७ रुपये आहे. तर दुसरीकडे iPhone 15 Pro Max ची भारतात किंमत १,५९,९०० रुपये आहे, तर अमेरिकेत ती ९९,५१७ रुपये आणि दुबईमध्ये १,१५,२३७ रुपये आहे.

भारतात का किंमत जास्तभारतात आयफोनची किंमत का अधिक आहे याबद्दल ॲपलच्या एका डिस्ट्रिब्युटरनं माहिती दिली. भारतात आयफोन महाग होण्याचं एक कारण म्हणजे त्याच्या अनेक कंपोनंट्सवर आयात शुल्क भरावं लागते. तसंच, अमेरिका आणि दुबईच्या तुलनेत भारतात त्यांचा व्यवसाय खूपच कमी आहे, असं ते म्हणाले. 

सायबरमीडिया रिसर्चचे इंडस्ट्री इंटेलिजेंस ग्रुपचे प्रमुख प्रभू राम म्हणाले की, भारतात याची किमत जास्त असण्यामागे अनेक कारणं आहेत. 'अंतिम किंमतीमागे अनेक घटक आहेत. आयात केलेल्या मॉडेल्सवरील कर आणि शुल्काचा प्रभाव कमी करण्यासाठी Apple आपल्या भागीदारांच्या मदतीनं सवलत देते. भारतात सुरुवातीला कंपनीचं लक्ष जुन्या मॉडेल्सवर असल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी, जेव्हा देशात iPhone 14 सीरिजची विक्री सुरू झाली, तेव्हा ५४ टक्के फोन जुन्या जनरेशनमधील होते. त्याच्या एक वर्ष आधी, जेव्हा आयफोन १३ सीरिज लॉन्च करण्यात आली होती, तेव्हा त्या सीरिजमधील केवळ २३ टक्के फोन आयात केले गेले होते. ७७ टक्के फोन जुन्या जनरेशनचे होते.

टॅग्स :अॅपलभारतअमेरिकादुबई