IPL Auction 2025 : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) साठी नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला. यामध्ये भारत आणि परदेशातील अनेक क्रिकेटपटूंवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडला. या लिलावात दरवर्षी बोलीचे विक्रम मोडलेजात आहेत. कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या देशी-विदेशी खेळाडूंच्या उत्पन्नावर किती टॅक्स लागतो? भारतीय क्रिकेटपटू देशाच्या कर कायद्यानुसार आयकर भरतात. पण परदेशी खेळाडूंच्या उत्पन्नावर टॅक्स लागतो? असे अनेक प्रश्न इंटरनेटवर सर्च केले जात आहेत. चला आज या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.
आयपीएल ही जगातील सर्वात आकर्षक T20 क्रिकेट लीग मानली जाते. यात खेळाडूंना खूप महागडे सॅलरी पॅकेज मिळते. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात भारतीय संघातील विकेटकिपर ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला तब्बल २७ कोटी रुपये देऊन करारबद्ध केलं आहे.
खेळाडूच्या उत्पन्नावर किती टॅक्स लागतो?
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या भारतीय आणि परदेशी खेळाडूंच्या कमाईवरील आयकर नियम वेगळे आहेत. खेळाडूंचे नागरिकत्व आणि भारतात कमावलेल्या उत्पन्नावर लागू होणारे भारतीय कर कायदे वेगवेगळे आहेत.
भारतीय नागरिकत्व
भारतीय कायद्यानुसार भारतीय खेळाडूंच्या देशाबाहेरील कमाईवर आयकर कापला जातो. मात्र, कर आकारणीमध्ये आयपीएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू अनिवासी म्हणून वर्गीकृत आहेत. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या कमाईवर टीडीएस कापला जातो, जो भारतीय खेळाडूंसाठी १०% आणि परदेशी खेळाडूंसाठी २०% निश्चित केला जातो. या खेळाडूंना टीडीएस कापल्यानंतरच कराराची रक्कम मिळते.
आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना कराराची रक्कम मिळवण्यासाठी प्रथम बीसीसीआय आणि फ्रँचायझी या दोघांसोबत त्रिकोणी करार करावा लागतो. कोणत्याही फ्रँचायझी संघाने पेमेंट देण्यास टाळाटाळ केली तर बीसीसीआय कारवाई करते. ते फ्रँचायझीच्या केंद्रीय महसूल निधीतून योग्य रक्कम कापून संबंधित खेळाडूला देतात.
भारतीय खेळाडूंसाठी काय नियम?
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, सीए सुरेश सुराणा यांनी सांगितले की, आयपीएल फ्रँचायझी संघांनी खेळाडूंना दिलेली रक्कम व्यावसायिक उत्पन्न मानली जाते. अशा परिस्थितीत, आयपीएलमधील कमाई एका वर्षातील त्यांच्या एकूण उत्पन्नात जोडली जाते. त्यानुसार आयकर स्लॅब दरांच्या आधारे कर कापला जातो.
परदेशी खेळाडूंसाठी काय नियम आहेत?
अनिवासी भारतीय (NRI) खेळाडू आणि परदेशी खेळाडू आयकर कायदा, १९६१ च्या कलम 115BBA च्या विशिष्ट तरतुदींनुसार परदेशी खेळाडूंच्या उत्पन्नावरही कर आकारला जातो. या कलमानुसार, अनिवासी खेळाडू जो भारताचा नागरिक नाही. अशा खेळाडूने भारतातील कोणत्याही खेळात किंवा स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्याचे उत्पन्न कर आकारणीच्या कक्षेत येते.
इतर उत्पन्नावरही लागतो टॅक्स
जे परदेशी खेळाडू भारतातील कोणत्याही खेळाची जाहिरात करतात किंवा भारतातील वर्तमानपत्रे, मासिके किंवा मासिकांमध्ये खेळाशी संबंधित लेख लिहितात, त्यांच्या कमाईवर २०% च्या प्लॅट दराने आयकर आकारला जातो. याव्यतिरिक्त, जेव्हा या खेळाडूंना भारतात त्यांचे उत्पन्न मिळते तेव्हा २०% TDS (स्रोतावर कर वजा) लागू होतो.