नवी दिल्ली - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे विजेतेपद यंदा चेन्नई सुपर किंग्सने पटकावले आहे. CSK ने गुजरात टायटन्सला हरवत पाचव्यांदा आयपीएलचे चॅम्पियन झाले आहेत. या सीझनमध्ये गुजरात टायटन्सला फायनलपर्यंत पोहचवणारा आणि सर्वात जास्त ३ शतके लगावणारा शुबमन गिल हा मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर ऑफ द सीझनसह ४ पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. त्याला ४० लाख रुपये बक्षीस म्हणून रक्कम दिली आहे. जर टॅक्स पाहिला तर बक्षिसात मिळालेल्या रक्कमेसाठी शुबमन गिलला १२ लाख रुपये टॅक्स भरावा लागणार आहे.
TDS किती रक्कम कापणार?
भारतात जर नोकरदार वर्गाने ५ लाखाहून अधिक पगार घेतला तर त्यावर TDS कापला जातो. बँकेत जमा रक्कमेवर ४० हजारांहून अधिक व्याज मिळाले तर त्यावरही कर आकारला जातो. मर्यादित उत्पन्नापेक्षा अधिक भाडे, कमिशन, डिविडेंट, पुरस्कार यातून मिळणाऱ्या रक्कमेवर कर घेतला जातो. या सर्व उत्पन्नावर टीडीएस कापला जातो. आयकर नियमानुसार, जास्त टीडीएस लॉटरी, क्विज, कार्ड गेम, हॉर्स रेस अथवा अन्य पुरस्कार म्हणून मिळणाऱ्या रक्कमेवर कापला जातो. तो ३० टक्के इतका असतो.
शुबमन गिलला किती रक्कम मिळाली?
आता शुबमन गिलच्या आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेवर टीडीएस कपात लागू केली तर त्याला किती रक्कम मिळेल. बघूया-
हंगामात सर्वाधिक धावा केल्याबद्दल शुबमन गिलला ऑरेंज कॅप मिळाली आणि त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझनसाठी शुभमनला १० लाख रुपये पुरस्कार म्हणून दिले. ड्रीम ११ गेम चेंजर ऑफ द सीझनचा पुरस्कार म्हणून त्याला १० लाख रुपये मिळाले. स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारल्याबद्दल शुबमनला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. अशाप्रकारे शुबमन गिलला एकूण ४० लाख रुपये रोख बक्षीस मिळाले.
आयकर कायदा १९६१ नुसार, कलम १९४ बी मध्ये लॉटरी, गेम शो, कार्ड गेम, ऑनलाईन गेम, क्रॉसवर्ड पजल्स, क्विज शो यासारख्या कार्यक्रमात १० हजाराहून अधिक रक्कम जिंकल्यास ३० टक्के टीडीएस लागू होतो. त्यामुळे शुबमन गिलला मिळालेल्या ४० लाखांच्या रक्कमेवर ३० टक्के म्हणजे १२ लाख रूपये कर म्हणून आकारले जातील. दरम्यान कलम १०(17A) अंतर्गत केंद्र अथवा राज्य सरकारकडून मिळालेली बक्षीस रक्कम ही करमुक्त असते.