मुंबई - शेअर बाजारामध्ये घसरण होत असली तरी एकापाठोपाठ एक कंपन्या आयपीओ घेऊन येत आहेत. या महिन्यातच देशातील सर्वात मोठा आयपीओ एलआयसी आयपीओ आला. त्या माध्यमातून लाखो लोकांना गुंतवणुकीची संधी मिळाली. मात्र मोठ्या प्रमाणावर सब्स्क्राईब करण्यात आल्याने एलआयसीच्या आयपीओबाबत अनेकांच्या पदरी निराशाच पडली. मात्र गुंतवणुकदारांसाठी या महिन्यात अजून एक चांगली संधी चालून येत आहे.
फर्टिलायझर कंपनी पाराद्विप फॉस्फेटचा आयपीओ १७ मे रोजी खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून केंद्र सरकार आपली सगळी हिस्सेदारी विकणार आहे. सध्या पाराद्विप फॉस्फेटमध्ये सरकारची १९.५५ टक्के भागीदारी आहे. याचा आयपीओ १९ मेपर्यंत खुला राहणार आहे. त्यासाठी ३९-४२ रुपयांचा प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. सेबीला सोपवलेल्या ड्राफ्टनुसार अँकर इन्व्हेस्टर्ससाठी हा आयपीओ १३ मे रोजी खुला होणार आहे.
या आयपीओमध्ये १ हजार ००४ कोटी रुपयांचे फ्रेश इश्शू समाविष्ट आहेत. त्याशिवाय प्रमोटर्स आणि अन्य शेअर होल्डर्स ऑफर फॉर सेलमध्ये ११.८५ कोटी इक्विटी शेअर सुद्धा विकायचे आहेत. तर झुआरी मेरोक फॉस्फेट प्रायव्हेट लिमिटेड ६० लाख १८ हजार ४९३ शेअरची विक्री करणार आहे. सध्या पॅराद्विप फॉस्फेटमध्ये झुआरी मेरोक फॉस्फेट प्रायव्हेट लिमिटेडची ८०.४५ टक्के भागीदारी आहे.