नवी दिल्ली : शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांचा सक्रिय सहभाग वाढत असतानाच प्रारंभिक भाग विक्रीद्वारे (आयपीओ) भारतीय कंपन्यांनी नऊ महिन्यांच्या काळामध्ये ९.७ अब्ज डॉलर जमा केले आहेत. कॅलेंडर वर्षाच्या नऊ महिन्यांमध्ये आयपीओच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा गेल्या दोन दशकांमधील हा उच्चांक आहे.
ईवाय या कंपनीच्या अहवालानुसार जानेवारी ते सप्टेंबर २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतामधील एकूण ७२ कंपन्यांनी प्रारंभिक भाग विक्री केली असून, त्या माध्यमातून ९.७ अब्ज डॉलरची संपत्ती जमा झाली आहे. गेल्या २० वर्षांमधील ही सर्वाधिक रक्कम आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्ये या कालखंडामध्ये तेजीचा अनुभव आला आहे. तसेच भारतीय शेअर बाजारामध्येही तेजी असल्याने त्याचा फायदा आयपीओला मिळाला असल्याचे सांगितले जाते. सन २०१८च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये १३१ आयपीओ बाजारामध्ये आले होते.
ईवायचे प्रशांत सिंघल यांनी सांगितले की, आयपीओंना चांगला प्रतिसाद लाभत असून, त्याचा फायदा यंदा भारतीय कंपन्यांना मिळाला आहे.
तिसऱ्या तिमाहीमध्ये सर्वाधिक प्रतिसाद
जुलै ते सप्टेंबर या चालू वर्षातील तिसऱ्या तिमाहीमध्ये ३१ कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले. त्यामधून सुमारे ५ अब्ज रुपयांची रक्कम उभारली गेली. तिसऱ्या तिमाहीमध्ये आयपीओला गुंतवणूकदारांचा सर्वाधिक प्रतिसाद लाभला आहे.