नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय निर्बंध हटल्यामुळे भारतीय बँकांमधील आपली खाती सक्रिय करण्याची मागणी इराणने भारत सरकारकडे केली आहे. इराणी बँकांना भारतात कार्यालये उघडण्याची परवानगी देण्याची मागणीही इराण सरकारने केली आहे.अधिकृत सूत्रांनी सांगितले की, इराणला जगासोबतचे बँकिंग आणि व्यापारी संबंध लवकरात लवकर सामान्य करायचे आहेत. याशिवाय भारताच्या युको बँकेने इराणमध्ये आपले प्रातिनिधिक कार्यालय उघडावे, अशीही इराणची इच्छा आहे. इराण सरकारने आयडीबीआय बँकेत या आधीच एक खाते उघडले आहे. इराणवरील आर्थिक निर्बंध उठल्यानंतर जगासोबत आर्थिक संबंध पूर्ववत करण्याचा इराणचा मार्ग मोकळा झाला आहे. इराणच्या केंद्रीय बँकेने गेल्याच महिन्यात यासंबंधीची घोषणा केली होती. जागतिक पातळीवरील आंतर बँक वित्तीय दूरसंचार सोसायटीने (स्वीफ्ट) आपल्या १२ बँकांवरील निर्बंध उठविले आहेत. या बँकांना स्वीफ्टशी जोडले जात आहे, असे इराणच्या केंद्रीय बँकेने म्हटले होते. इराणवर निर्बंध लादले गेल्यानंतर २0१२ मध्ये इराणच्या बँकिंग व्यवस्थेला स्वीफ्टपासून तोडण्यात आले होते. इराणने अण्वस्त्र कार्यक्रम राबविल्यामुळे हे निर्बंध लादण्यात आले होते. सेंट्रल बँक आॅफ इराणचे डेप्युटी गव्हर्नर गुलामअली कामयाब यांनी सांगितले की, बँक पसरगाद आणि पर्शियन बँक यांना भारतात आपली प्रातिनिधिक कार्यालये उघडायची आहेत. तसेच समन बँक अनुषंगिक कार्यालय उघडण्यास इच्छुक आहे. योग्य ती माहिती भारत सरकारला आम्ही दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालयाने भारतीय बँकांसोबत इराणी बँकांच्या खात्याचे परिचालन सुरू करावे, अशी विनंती भारत सरकारला करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँकेची सेंट्रल बँक आॅफ इराणसह ११ इराणी बँकेत खाती आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
बँक खाती सक्रिय करण्याची इराणची भारताकडे मागणी
By admin | Published: February 09, 2016 1:50 AM