लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढल्यामुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, जगातील टॉप-१० श्रीमंतांची संपत्ती २८ अब्ज डॉलरनी घटली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार सोमवारी जगभरातील १५ श्रीमंतांपैकी केवळ २ जणांची संपत्ती वाढली आहे. १३ जणांची संपत्ती घटली आहे. सर्वोच्च १० श्रीमंतांची संपत्ती २८ अब्ज डॉलर म्हणजेच २३,३९,९७,८२,००,००० रुपयांनी घसरली. सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती २.९१ अब्ज डॉलरनी वाढून २१८ अब्ज डॉलर झाली. १५ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती स्पेनचे एमेन्शियो ओर्टेगा यांची संपत्ती १.०८ अब्ज डॉलरने वाढली.
सर्वाधिक नुकसान इलॉन मस्क यांचे झाले. त्यांची संपत्ती ६.८४ अब्ज डॉलरने घटली. दुसऱ्या स्थानावर असलेले ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची संपत्ती ३.११ अब्ज डॉलरने घटून २०५ अब्ज डॉलरवर आली. १७८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह मस्क हे यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. फेसबुकची पालक कंपनी मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती ४.०८ अब्ज डॉलरने घटून १७८ अब्ज डॉलर झाली. बिल गेट्स यांची संपत्ती १.६५ अब्ज डॉलरने घटून १५० अब्ज डॉलर झाली.
अंबानी, अदानींना झळ- आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती ८०.६ कोटी डॉलरने घटून ११२ अब्ज डॉलरवर आली. ते जागतिक श्रीमंतांच्या यादीत ११ व्या स्थानावर आहेत. - अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांची संपत्ती २.३६ अब्ज डॉलरने घटून ९९.५ अब्ज डॉलर झाली. ते यादीत १४ व्या स्थानावर आहेत.