Join us

इराण तेल उत्पादन वाढविणार !

By admin | Published: January 16, 2016 2:18 AM

अण्वस्त्र निर्मितीवरून निर्माण झालेला वाद निकाली निघाल्यानंतर इराण पुन्हा एकदा खनिज तेलाचे उत्पादन वाढवीत आहे. उत्पादन वाढवून भारत आणि युरोपीय देशांना

लंडन/सिंगापूर : अण्वस्त्र निर्मितीवरून निर्माण झालेला वाद निकाली निघाल्यानंतर इराण पुन्हा एकदा खनिज तेलाचे उत्पादन वाढवीत आहे. उत्पादन वाढवून भारत आणि युरोपीय देशांना तेलाचा पुरवठा करण्याचे इराणचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने भारत आणि युरोपीय देशांना दररोज लाखो बॅरल तेलाचा पुरवठा करण्याची योजना इराण आखत आहे. सध्या तेलाचे भाव सर्वात कमी असल्याने भारताला त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.संयुक्त राष्ट्रांच्या न्यूक्लिअर वॉचडॉगकडून आपल्या अणुकार्यक्रमातील कपातीला मंजुरी मिळेल, अशी इराणला आशा आहे. त्यामुळे इराणवर लादण्यात आलेले निर्बंध समाप्त होतील. या निर्बंधामुळे इराणच्या तेल निर्यातीवर विपरीत परिणाम होऊन मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. आता दररोज पाच लाख बॅरल तेलाचे उत्पादन करण्याची योजना इराण आखत आहे. त्याचबरोबर तेल निर्यातीसाठी लागणाऱ्या खर्चातही मोठी गुंतवणूक करण्याची इराणची तयारी आहे. इराणच्या या पावलाने बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तेल बाजारावर अगोदरच दडपण आहे. २0१४ पासून आतापर्यंत तेलाच्या भावात ७0 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. सध्या तेलाचे भाव ३0 डॉलर प्रतिबॅरलच्या स्तरावर आहेत.इराणच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खनिज तेलाच्या बाबतीत इराण भारताला अतिशय महत्त्व देतो. दुसऱ्या आशियाई देशांच्या तुलनेत भारतात खनिज तेलाची मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळे आमच्या अन्य प्रतिस्पर्ध्याप्रमाणेच आम्हीही भारतालाच महत्त्व देतो. भारताला सध्या इराणकडून दररोज २ लाख बॅरलची निर्यात होते. ती वाढवून २ लाख ६0 हजार बॅरल करण्याची इराणची योजना आहे.दुसरीकडे भारतातील तेल संशोधन प्रकल्पही इराणकडून तेल खरेदी करण्यास इच्छुक आहेत. भारतात दरवर्षी १0 टक्के कार विक्री वाढत आहे. विक्रीचा हा दर चीनपेक्षाही जास्त आहे. एस्सार आॅईल या भारतीय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एल. के. गुप्ता म्हणाले की, आमचा इराणशी जुना व्यावसायिक संबंध आहे. इराणवरील निर्बंध हटविल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची आम्हाला प्रतीक्षा आहे.इराणचा एक अधिकारी म्हणाला की, चीन, दक्षिण कोरिया आणि जपानचा आर्थिक विकास सतत मंदावत आहे. त्यामुळे त्या देशांकडून आम्हाला फार अपेक्षा नाहीत.