Join us  

IRCTC News: आयआरसीटीसीला रेल्वे मंत्र्यांचा इशारा; सहा महिन्यांत कॅटरिंग सेवा नीट करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 11:36 AM

खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या तक्रारींची दखल घेतली आहे. रेल्वेमंत्र्यांनी सोमवारी आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांना जोरदार फटकारल्याची माहिती समोर आली आहे.

IRCTC News: भारतीय रेल्वेमधील (Indian Railways) कॅटरिंग सेवा हाताळण्यासाठी सरकारनं स्वतंत्र कंपनी ची निर्मिती केली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (Indian Railway Catering and Tourism Corporation) असं त्याचं नाव आहे. ही कंपनी मोठ्या प्रमाणात सक्रिय असूनही ट्रेनमध्ये खराब जेवण दिलं जात असल्याच्या बातम्या समोर येत आहे. व्हीव्हीआयपी ट्रेन वंदे भारतच्या (Vande Bharat) जेवणातही झुरळं सापडल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. रेल्वेमंत्र्यांनी सोमवारी आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांना जोरदार फटकारल्याची माहिती समोर आली आहे.

पॅन्ट्री कारचं डीप क्लिनिंग करा

रेल्वे बोर्डाशी संबंधित अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रेल्वेमंत्री आढावा बैठक घेत होते. यावेळी त्यांनी आयआरसीटीसीला प्रवाशांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा आणि स्वच्छतेबाबत प्रश्न विचारले. कंपनीकडून मिळालेल्या प्रतिसादावर त्यांचं समाधान झालं नाही. ट्रेनच्या ज्या पॅन्ट्री कारमध्ये अन्न शिजवलं जातं, कुठे सामान साठवलं जातं आणि जेथे अन्न पॅक केलं जातं त्या सर्व पॅन्ट्री कारमध्ये मिशन मोडवर सखोल साफसफाई करण्यात यावी, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. इतकंच नव्हे तर आयआरसीटीसीनं ज्या १००० ठिकाणी आपले बेस किचन किंवा सेंट्रल किचन बनवले आहे, त्यांचंही तेदेखील अपग्रेड करण्यात यावं आणि हे काम पुढच्या सहा महिन्यांत पूर्ण झालं पाहिजे असे निर्देशही त्यांनी दिले.

तक्रारी वाढल्या

आजकाल रेल्वे कॅटरिंगची, विशेषत: ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. 'वंदे भारत' या व्हीव्हीआयपी ट्रेनच्या जेवणाबाबत अनेकदा सोशल मीडियावर तक्रारी पाहायला मिळतात. गेल्या आठवड्यात म्हणजे १८ जून रोजी एक प्रवासी वंदे भारतमधून भोपाळहून आग्र्याला जात होता. त्यांना देण्यात आलेल्या जेवणात झुरळं आढळून आली. या प्रवाशानं त्याचा फोटोही सोशल मीडियावर टाकला. यानंतर आयआरसीटीसीने त्या वेंडरला काही दंडही ठोठावला.

वंदे भारत, राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये तिकिटासह खाण्या-पिण्याच्या पदार्थांचं शुल्क आकारलं जातं. पण कॉमन मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये पॅन्ट्री कारच्या लोकांच्या अनेक तक्रारी असतात. जादा पैसे आकारणं ही त्यांची सामान्य तक्रार आहे.

टॅग्स :व्यवसायभारतीय रेल्वेअश्विनी वैष्णव