नवी दिल्ली : आयआरसीटीसीने (IRCTC) धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी श्री रामायण यात्रेची योजना आखली आहे. श्री रामायण यात्रा आजपासून म्हणजेच ७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ही यात्रेसाठी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्टेशनपासून प्रवास सुरू होईल आणि प्रभू रामाच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणे कव्हर केली जातील. तुम्हालाही श्री रामायण यात्रेअंतर्गत धार्मिक सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
या ट्रेनचा पहिला थांबा अयोध्या असेल, जिथे यात्रेकरू नंदीग्राममधील भारत मंदिराशिवाय श्री रामजन्मभूमी मंदिर आणि हनुमान मंदिराला भेट देतील. यानंतर बिहारमधील सीतामढीला रवाना होतील. याशिवाय, जनकपूर येथील राम जानकी मंदिराला सुद्धा भेट देता येणार आहे. यानंतर यात्रेकरू वाराणसीला रवाना होतील. वाराणसीहून प्रवासी प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटला फिरायला जातील. यानंतर नाशिकला नेण्यात येईल. याठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिर आणि पंचवटीला भेट देतील. यानंतर यात्रेकरू हंपीला रवाना होतील, हंपीमध्येच किष्किंधा हे प्राचीन शहर होते. यानंतर प्रवासी या दौऱ्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या रामेश्वरमला रवाना होतील.
यात्रेसाठी किती असेल भाडे?
आयआरसीटीसीने देखो अपना देश कार्यक्रमांतर्गत श्री रामायण यात्रा सुरू केली आहे. श्री रामायण यात्रेसाठी स्वतंत्र भाडे निश्चित करण्यात आले आहे. या प्रवासाअंतर्गत सेकंड एसी क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 82,950 रुपये आकारले जातील. तर, फर्स्ट एसीमध्ये प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 1,02,095 रुपये आकारले जातील. या प्रवासादरम्यान यात्रेकरूंना एसी हॉटेलमध्ये राहण्याची सोय, जेवण, प्रेक्षणीय स्थळांसाठी एसी वाहने आणि प्रवाशांचा प्रवास विमा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय, प्रवासादरम्यान प्रवाशांच्या आरोग्यविषयक सेवा आणि सुविधांचीही पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.