IRCTC Stock Split : आयआरसीटीसीचा शेअर स्प्लिट झाल्यानंतर गुरूवारी सुरूवातीच्या कामकाजादरम्यान एनएसईवर (NSE) शेअर १९ टक्क्यांनी वधारून ९८३ रूपये प्रति शेअरवर पोहोचला होता. परंतु कामाकाजाच्या अखेरच्या सत्रात हा शेअर ९६.९५ रूपयांनी म्हणजेच ११.७४ टक्क्यांनी वाझून ९२३ रूपयांवर बंद झाला. Stock Split नंतर कंपनीच्या एक शेअरचं ५ शेअर्समध्ये विभाजन झालं. याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीकडे जर IRCTC चे १० शेअर्स असतील तर ते आता ५० शेअर्स झाले आहेत.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे (IRCTC) चे शेअर्स गुरूवारी एक्स-स्प्लिट ट्रेडिंग करत होते. यापूर्वी आयआरसीटीसीच्या एका शेअरची फेस व्हॅल्यू १० रूपये इतकी होती. परंतु स्प्लिट शेअरनंतर या शेअरची फेस व्हॅल्यू आता २ रूपये इतकी झाली आहे. पहिल्या तिमाहीतील कमाईची उत्पन्नाची करताना, IRCTC ने त्यांच्या स्टॉक स्प्लिट योजना जाहीर केली होत्या. बोर्डाने १:५ स्टॉक स्प्लिटच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
सप्टेंबरपासून शेअर्समध्ये तेजी
IRCTC च्या शेअर्समध्ये सप्टेंबर महिन्यापासून तेजी पाहायला मिळाली होती. १ सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअरची किंमच २७३० रूपये होती. परंतु यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत हा शेअर ४ हजार रूपयांच्या जवळ पोहोचला. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातही शेअर्समध्ये तेजीचं सत्र सुरू होतं. दीर्घ कालावधीसाठी हा शेअर २ हजार रूपयांच्या टप्प्यात होता. परंतु कंपनीनं शेअर स्प्लिट करण्याची घोषणा केल्यानंतर या शेअर्सच्या किंमतीत तेजी दिसून आली.