नवी दिल्ली : सध्या केंद्र सरकारचा फोकस लक्झरी ट्रेनकडे वाढल्याचे दिसून येत आहे. सुपरफास्ट वंदे भारत ट्रेननंतर आता सरकार 'भारत गौरव'च्या आणखी ट्रेन आणण्याच्या तयारीत आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत लक्झरीचा अनुभव पोहोचवणे, हा यामागील उद्देश आहे. अलीकडे, 'देखो अपना देश' या थीम अंतर्गत, IRCTC म्हणजेच केटरिंग अँड ट्यूरिझ्म कॉर्पोरेशन लवकरच 300 हून अधिक गौरव ट्रेन सुरू करणार आहे, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या ट्रेन एका वर्षात म्हणजेच 2023-24 आर्थिक वर्षात सुरू केल्या जातील.
वंदे भारत आणि भारत गौरव ट्रेन सर्वसामान्यांना लक्झरीची अनुभूती देतात. म्हणजेच ही ट्रेन कोणत्याही 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. भारत गौरव ट्रेन 'देखो अपना देश' या थीम अंतर्गत देशातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये प्रवास करते. भारतीय रेल्वेची योजना काय आहे आणि तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतील, याबद्दल जाणून घ्या...
किती असेल प्रवासी भाडे?
'देखो अपना देश' अंतर्गत या ट्रेनचे भाडे थोडे जास्त असू शकते. मात्र, जर हे तुम्हाला टूर पॅकेज देत असेल तर तुम्हाला ते कमी वाटेल. ट्रेनचे भाडे एसी टियर-2 मध्ये प्रति प्रवासी जवळपास 52,250 रुपये असेल असा अंदाज आहे. तर, एसी टीयर - 1 साठी हे जवळपास 67,140 रुपये असणार आहे.
फाईव्ह स्टार सारखा सुविधा मिळतील
या ट्रेनचा उद्देश भारतातील पर्यटनाला चालना देणे हा आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हाला फाईव्ह स्टार सारखा फील मिळेल. या डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेनमध्ये तुम्हाला दोन आलिशान रेस्टॉरंट्स, एक डिलक्स किचन, डब्यांमध्ये शॉवर क्यूबिकल्स, सेन्सरवर चालणारा वॉशरूम फंक्शन्स, फूट मसाजर आणि एक मिनी लायब्ररी अशा अनेक सुविधा मिळतात.
पर्यटनाला चालना मिळेल
या ट्रेन नॉर्थ ईस्टच्या टुरिस्ट सर्कलवरून धावतील. यामध्ये जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही उत्तराखंड आणि मध्य प्रदेश टुरिस्ट सर्कलवर प्रवास करू शकाल. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. यासोबतच महसूलही चांगला मिळेल. सध्या देशात 15 हून अधिक भारत गौरव ट्रेन धावत आहेत. ज्या IRCTC च्या मास्टर प्लॅन अंतर्गत या वर्षी 300 पर्यंत वाढवला जातील, असे म्हटले जात आहे.