नवी दिल्ली : कोरोना संकट काळात सर्वाधिक सुरक्षित ट्रान्सपोटेशन साधन म्हणून विमान प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे. विमान कंपना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी प्रवाशांना विविध ऑफर देत आहेत. यातच आयआरसीटीसीने (IRCTC) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर आणली आहे. आयआरसीटीसीच्या प्लॅटफॉर्मवरून विमान तिकिट बुक केल्यास कंपनीकडून आपल्याला ५० लाख रुपयांचा प्रवास विमा विनाशुल्क मिळेल. याशिवाय, कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक जागतिक दर्जाचे फायदेही देत आहे. (irctc offers free travel insurance of up to rs 50 lakh on flight tickets booking know details)
ग्राहकांना इतरही फायदे मिळणार
आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपवरून तिकिट बुक करण्यासाठी सुविधा शुल्क केवळ ५० रुपये आकारले जाईल. ग्राहकांना ५० हून अधिक पेमेंट मोडमधून ट्रॅव्हल फेअर पेमेंटची सुविधा मिळत आहे. याशिवाय तिकीट बुक करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क (Hidden Charges) आकारले जाणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
स्वस्तात मोठा फायदा
विनामूल्य विमा योजना सर्व विमान प्रवाशांसाठी असणार आहे. म्हणजेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससोबत प्रत्येक श्रेणीतील तिकिटे घेणार्या प्रवाशांना याचा फायदा होईल. दरम्यान, सध्या खासगी ट्रॅव्हल साइटवरून प्रवाशांना या प्रकारचा विमा मिळण्यासाठी निश्चित रक्कम भरावी लागते. ट्रॅव्हल साइट्स प्रत्येक तिकिटावर २०० रुपये शुल्क आकारतात. त्याचबरोबर आयआरसीटीसीमध्ये यासाठी केवळ ५० रुपये घेतले जात आहेत.
या लोकांना मिळणार स्पेशल ऑफर
संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डिफेंस पर्सनलसाठी स्पेशल प्रवासी भाड्याची सुद्धा ऑफर कंपनीद्वारे देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने आपल्या ग्राहकांना एकत्र विविध शहरांसाठी तिकिट बुकिंग, क्रेडिट शेल, सुपर सेव्हर, री-शेड्यूलिंग आणि सहज परतावा यासारख्या सुविधा देत आहे. तसेच, एलटीसी तिकिटांचे बुकिंगदेखील त्याच्या प्लॅटफॉर्मवरून सहज केले जाऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. बर्याच राज्यांमध्ये आंशिक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी व्यवसाय, कार्यालये बंद आहेत. अनेक ठिकाणी आर्थिक चक्रदेखील मंदावले आहे. परिणामी, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी लोकांची हालचालही कमी झाली आहे.