Join us

एकाच पॉलिसीमध्ये जीवन, आरोग्य आणि कार विम्याचे संरक्षण; काय आहे IRDA ची योजना? जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 6:29 PM

All in One Policy : IRDAI अशी एकच पॉलिसी आणण्यावर काम करत आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या विम्याचा समावेश असणार आहे.

आत्तापर्यंत देशात जीवन, आरोग्य आणि कार विम्यासह इतर विमा उत्पादनांचे लाभ मिळवण्यासाठी स्वतंत्र पॉलिसी घेणे आवश्यक होते, परंतु येत्या काही दिवसांत तुम्हाला हे सर्व लाभ एकाच पॉलिसीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, विमा नियामक संस्था IRDAI अशी एकच पॉलिसी आणण्यावर काम करत आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या विम्याचा समावेश असणार आहे आणि ग्राहकांना वेगळी पॉलिसी घ्यावी लागणार नाही. म्हणजेच, ही ऑल इन वन पॉलिसी असणार आहे.

जर IRDAI ही योजना यशस्वी झाल्यास देशभरातील कुटुंबांना लवकरच एकच पॉलिसी मिळू शकेल. IRDAI ने देशातील विमा उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पुढाकार घेतला आहे. IRDAI चे 'विमा ट्रिनिटी' एक परवडणारे उत्पादन आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य, जीवन, मालमत्ता आणि अपघात कव्हरेज प्रदान करणे आहे. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, देश विमा उत्पादनांचा वेगाने विस्तार करण्यासाठी अशा योजनेवर काम करत आहे. ऑल इन वन विमा पॉलिसी एकाधिक जोखीम संरक्षण एकत्र आणेल आणि दावे एका सामान्य उद्योग मंचाशी जोडून सेटलमेंट प्रक्रिया सुलभ होईल.

IRDAI चे प्रमुख देवाशिष पांडा म्हणाले की, हे काम निश्चितच अवघड आहे, पण चर्चा सुरू आहे. ग्राहकांच्या सर्व जोखमी एका पॉलिसीद्वारे कव्हर केल्या जाव्यात, तसेच ही पॉलिसी सर्वांना सहज उपलब्ध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. याशिवाय या पॉलिसीचा प्रीमियम कमी असायला हवा आणि क्लेम सेटलमेंटही लवकर व्हायला हवे, असे आयआरडीएचे प्रमुख देवाशिष पांडा म्हणाले. तसेच, आमची योजना आकाराला आली तर देशभरातील कुटुंबांना लवकरच अशा स्वस्त सिंगल पॉलिसीची भेट मिळेल, ज्यामध्ये आरोग्य, जीवन, मालमत्ता आणि अपघात कवच याबाबत सुरक्षा प्रदान केली जाईल, असेही ते म्हणाले.

याचबरोबर, या पॉलिसीद्वारे क्लेम सेटलमेंट काही तासांतच होईल. सर्वसामान्यांना वेगवेगळ्या गरजांसाठी विमा पॉलिसीसाठी भटकावे लागू नये, अशी IRDAI ची इच्छा आहे. एकाच वेळी, व्यक्तीने अशी पॉलिसी घ्यावी, ज्यामध्ये आरोग्य, जीवन आणि मालमत्तेसह सर्व क्षेत्रांशी संबंधित जोखीम समाविष्ट असतील आणि सर्व पॉलिसींचा प्रीमियम एकरकमी भरावा लागेल, असेही देवाशिष पांडा यांनी सांगितले.

टॅग्स :व्यवसाय