Gautam Adani Paytm Deal : जगातील आघाडीच्या अब्जाधीशांपैकी एक असलेले गौतम अदानी (Gautam Adani) आपला व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि आता त्यांची नजर भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) निर्बंध घातलेल्या फिनटेक फर्म पेटीएमवर (Paytm) असल्याचं म्हटलं जातं होतं. पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन (Adani-Paytm Deal) मधील हिस्सा खरेदी करण्याचा अदानी समूह विचार करत असून बोलणी सुरू असल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतु आता त्यावर पेटीएमकडून एक अपडेट देण्यात आली आहे. या रिपोर्ट्समध्ये केवळ अंदाज बांधले जात असल्याचं पेटीएमनं म्हटलंय.
या संदर्भात कोणतीही चर्चा सुरू नाही. ही बातमी काल्पनिक असल्याचं पेटीएमनं स्पष्ट केलंय. कंपनी सेबीच्या (SEBI) नियम २०१५ अंतर्गत आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करीत आहे आणि यापुढेही करत राहील, असं पेटीएमनं म्हटलंय.
तिमाहीत पेटीएमला मोठं नुकसान
काही दिवसांपूर्वीच पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) रिझर्व्ह बँकेनं कारवाई (RBI Action On Paytm) केली होती. यामुळे पेटीएमला मोठा झटका बसला आणि तिमाहीमध्येही मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. विजय शेखर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील कंपनीला मार्च तिमाहीत ५४९.६० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, जो डिसेंबर तिमाहीत २१९.८० कोटी रुपये आणि मागील वर्षी याच तिमाहीत १६८.९० कोटी रुपये होता.
यापूर्वी अदानी समूहानं आपला व्यवसाय वाढवत एसीसी आणि अंबुजा सिमेंट या सिमेंट कंपन्यांचं अधिग्रहण केलं होतं आणि गेल्या आर्थिक वर्षात मीडिया फर्म एनडीटीव्हीलाही आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केलं.
शर्मा यांचा पेटीएममध्ये १९% हिस्सा
रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईनंतर हे फिनटेक फर्म संकटात सापडलं आहे. यादरम्यान, सॉफ्टबँकेनं पेटीएममधील आपला हिस्सा विकला होता. याशिवाय वॉरन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेही गेल्या वर्षी पेटीएममधून बाहेर पडली. विजय शेखर शर्मा यांच्याकडे पेटीएममध्ये जवळपास १९ टक्के हिस्सा आहे.