अजित जोशी, चार्टर्ड अकाउंटंट
प्रश्न : मी एक उच्च उत्पन्न गटातला नोकरदार आहे. बँकेत ठेवलेल्या एफडीवर जे व्याज येतं, त्यावर सर्वोच्च दराने म्हणजे ३० टक्के कर लागतो. मी माझी गृहिणी पत्नीच्या नावावर एफडी करून कर वाचवू शकेन का? पत्नीला भेट दिलेल्या रकमेवर कर नाही ना?
उत्तर : बरोबर आहे. पत्नीला किंवा जवळच्या नातेवाइकांना दिलेल्या रकमेवर कर नाही. पण, त्याचबरोबर अशा रकमेवर जे उत्पन्न येतं, ते पतीच्या उत्पन्नातच धरावं लागतं. त्यामुळे भले एफडी पत्नीच्या नावे केली तरी व्याज तुमच्याच उत्पन्नात धरलं जाईल आणि कर वाचविता येणार नाही. हाच नियम सुनेला गिफ्ट केलेल्या रकमेवरही लागू होतो.
प्रश्न : जानेवारी २०११ ला ८० लाखांत घेतलेला फ्लॅट मी आता १ कोटी ७६ लाखांना विकतो आहे. मात्र, त्यातून नवीन घर घेताना मला ते फक्त एक कोटी पंचवीस लाखांपर्यंत घ्यायचं आहे. मला किती भांडवली कर भरावा लागेल?
उत्तर : भांडवली व्यवहारात नफ्याचा हिशोब करताना घराची खरेदी किंमत नाही तर त्या किमतीची इंडेक्सड किंमत पाहावी लागते. म्हणजे निव्वळ महागाईने त्या घराच्या किमतीत काय फरक पडला तो. २०१०-११ चा महागाई निर्देशांक आहे १६७ आणि २०२२-२३ साठी तो आहे ३३१. म्हणजेच तुमच्या घराची खरेदी किंमत धरली जाईल, ८० लाख गुणिले ३३१ भागीले १६७. म्हणजे १ कोटी ५८ लाखांहून थोडी अधिक. आता विक्री जर १ कोटी ७६ लाखांना असेल तर याचा अर्थ करांच्या उद्देशासाठी कागदोपत्री तुम्हाला भांडवली नफा झालेला आहे. अवघ्या १८ लाखांहून कमी! लक्षात ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारे पुन्हा घरात गुंतवणूक करून कर वाचवायचा असेल, तर नव्या फ्लॅटची खरेदी रक्कम ही फक्त भांडवली नफ्याच्या रकमेहून अधिक हवी. जुनं घर विकून आलेले सर्व पैसे गुंतवायची आवश्यकता नाही. असंही तुम्ही घेत असलेलं नवं घर १ कोटी २५ लाखांच्या घरात आहे, म्हणजे १८ लाखांहून कितीतरी अधिक. तेव्हा भांडवली नफा कराच्या उद्देशाने शून्य आणि त्यावर करही काहीच लागणार नाही. याशिवाय जुनं घर विकताना दिलेलं कमिशन विक्रीच्या रकमेतून वजा करता येतं. त्याचप्रमाणे जर त्या घरावर काहीही रचनात्मक, मूलभूत बदल केलेले असतील, तर त्यावर झालेला खर्चही, आधी सांगितलेलं इंडेक्ससेशन लागू करून, विक्रीच्या मूल्यातून कमी करता येतं.