- प्रसाद गो. जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बऱ्याच कालावधीनंतर परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारात केलेली गुंतवणूक आणि चांगले आलेले कंपन्यांचे निकाल यामुळे गतसप्ताहात शेअर बाजार वाढला. सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये निर्देशांक हिरवेगार झाले. चालू सप्ताहात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीची बैठक होत असून, त्यामध्ये शुक्रवारी व्याजदराबाबतचा निर्णय होणार आहे. यावेळी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता दिसत आहे.
विविध आस्थापनांचे जाहीर झालेले चांगले निकाल, अमेरिकेतील व्याजदर यापुढे कमी वेगाने वाढण्याची झालेली घोषणा आणि सुमारे नऊ महिन्यांनंतर बाजारात खरेदीसाठी सक्रिय झालेल्या परकीय वित्तसंस्था यामुळे बाजारात चांगले व्यवहार होऊन जवळपास सर्वच निर्देशांकांमध्ये वाढ झाली. बाजाराचा सेन्सेक्स १४९८.०२ अंशांनी, तर निफ्टी ११०९.०५ अंशांनी वाढले. निफ्टीने गाठलेला १७ हजारांचा टप्पा हे आणखी एक वैशिष्ट्य होय. चालू आठवड्यातही बाजारात वाढ होण्याची शक्यता आहे.
कंपन्या ५.५० लाख कोटींनी श्रीमंत
शेअर बाजारातील वाढीचा परिणाम कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ होण्यामध्ये झाला आहे. गत सप्ताहामध्ये शेअर बाजारातील सर्व कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ५,४९,६३४.७५ कोटी रुपयांनी वाढले आहे. आता एकूण भांडवल मूल्य २,६६,५८,९६९.२७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
गुंतवणूक वाढणार?
मागील नऊ महिन्यांपासून भारतीय बाजारात सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी गत महिन्यात सुमारे पाच हजार कोटी रुपयांची खरेदी केली. मोठ्या अवधीनंतर बाजारात परतलेल्या परकीय वित्तसंस्थांनी बाजाराला उभारी दिली आहे. जून महिन्यात या संस्थांनी भारतीय बाजारातून ५०,१२५ कोटी रुपयांची रक्कम काढून घेतली आहे. चालू महिन्यातही परकीय वित्तसंस्थांची खरेदी कायम राहण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात काय होणार?
आगामी सप्ताहामध्ये जाहीर होणारी वाहन विक्री आणि पीएमआयची आकडेवारी ही आधी बाजाराला दिशा दाखवेल. त्यानंतर शुक्रवारी जाहीर होणारे पतधोरण हे पुढच्या सप्ताहावर परिणाम करेल, असे दिसते.