आयटीआर भरण्याची वेळ आता जवळ आली असून लोक इन्कम टॅक्स रिटर्नही (Income Tax Return) भरण्यास सुरुवातझाली आहे. सर्व कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना फॉर्म-१६ (Form 16) ही देण्यात येतोय. प्रत्येक पगारदार व्यक्तीसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फॉर्म-१६ हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला ही आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला फॉर्म-१६ ची गरज भासेल. मात्र, अनेकदा कंपनीकडून फॉर्म-१६ शेअर करण्यास टाळाटाळ केली जाते. अशा परिस्थितीत आपण काय करू शकता ते जाणून घेऊया.
कसा कराल डाऊनलोड?
जर तुमच्या कंपनीनं फॉर्म-१६ दिला नसेल तर तुम्ही ते स्वत: डाऊनलोड करू शकता. यासाठी सर्वप्रथम www.tdscpc.gov.in टीआरईएसच्या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला तुमचा युजर आयडी, पासवर्ड, पॅन आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावं लागेल. डॅशबोर्डवर तुम्हाला डाऊनलोड ऑप्शन दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म-१६ वर जाऊन त्यावर वर क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला फॉर्म-१६ मिळेल. जर तुम्ही आधीच एनआरसीवर रजिस्टर्ड नसाल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल.
फॉर्म-१६ मध्ये तुमच्याकडून किती कर आकारला गेला आहे आणि कोणत्या वजावटींचा तुम्हाला फायदा झाला आहे हे दाखवण्यात येतं. यामध्ये तुम्हाला मिळालेला पगार, त्यावरील कर, तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत यासह सर्व प्रकारच्या कपातीची माहिती असते.
फॉर्म १६ चे २ भाग
फॉर्म-१६ चे दोन भाग आहेत. एक फॉर्म १६ पार्ट ए आणि दुसरा फॉर्म १६ पार्ट बी. पार्ट ए मध्ये कंपनीचे टॅन, कंपनीचं पॅन, कर्मचाऱ्याचं पॅन, पत्ता, मूल्यांकन वर्ष, नोकरीचा कालावधी याबद्दल लिहिले आहे. याशिवाय सरकारकडे जमा झालेल्या टीडीएसचा तपशीलही देण्यात येतो.
फॉर्म-१६ च्या पार्ट बी चा संदर्भ घेतला तर त्यात पगार ब्रेकअपसह कराची माहिती असते. यात तुमचा ग्रॉस सॅलरी किती आहे, नेट सॅलरी किती आहे, तुम्हाला घरभाडे भत्ता किती मिळाला आहे, पीएफ खात्यात किती पैसे गेले आहेत, याची माहिती दिली जाते. तसेच तुमच्या पगारावर किती प्रोफेशनल टॅक्स आकारला जातो आणि वेगवेगळ्या कलमांखाली तुम्हाला कोणती वजावट मिळाली आहे, याची माहिती मिळते. यात तुमची गुंतवणूक, मेडिकलमध्ये तुम्ही काय गुंतवणूक केली आहे, बचत योजनेत किती पैसे गुंतवले आहेत आणि तुम्हाला कोणत्या करसवलती मिळाल्या आहेत, याची ही माहिती असते.