Isha Anbani Got Award : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पुढची पिढीही आता उद्योगांमध्ये नाव कमावत आहे. मुलगी ईशा अंबानी यांना हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये आयकॉन ऑफ द इयरचा किताब मिळाला आहे. ख्यातनाम इंटिरियर डिझायनर आणि उद्योजिका गौरी खान यांच्या हस्ते ईशा अंबानीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इशा अंबानी यांनी आपल्या पुरस्काराच्या भाषणात हा सन्मान घरातील २ स्त्रियांना समर्पित केला आहे.
ईशा अंबानी यांनी पुरस्कार कुणाला केला समर्पित?
ईशा अंबानी यांनी आपला 'आयकॉन ऑफ द इयर' हा पुरस्कार त्यांची आई नीता अंबानी आणि त्यांची मुलगी आदिया यांना समर्पित केला. ईशा अंबानी म्हणाल्या की हा पुरस्कार मला माझ्या मुलीला समर्पित करायचा आहे, जी तिला दररोज अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा देते. त्यांची आई नीता अंबानी त्यांच्या आदर्श आहेत. नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्याही अध्यक्षा आहेत. या भाषणादरम्यान ईशा अंबानी म्हणाल्या, "मी नेहमी माझ्या आईला सांगते की तुझ्या पुढे चालल्याबद्दल धन्यवाद, यामुळे मला धावण्याची संधी मिळाली आणि माझा मार्ग अगदी सहज मोकळा झाला."
ईशा अंबानींकडे रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे नेतृत्व
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालकांपैकी एक असलेल्या ईशा अंबानी सध्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे (RRVL) नेतृत्व करत आहेत. या वर्षात ईशा अंबानी बऱ्याच वेळा चर्चेत आल्या आहेत. लहान भाऊ अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या विविध फंक्शनमध्ये त्यांच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा आशियातील टॉप १० रिटेलर्समध्ये समावेश
ईशा अंबानींच्या नेतृत्वात रिलायन्स रिटेलचा आशियातील टॉप १० रिटेलर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. जागतिक टॉप १०० रिटेलर्समध्ये समाविष्ट असलेली ही एकमेव भारतीय कंपनी आहे. रिलायन्स रिटेल ही RIL (रिलायन्स इंडस्ट्रीज) ची उपकंपनी आहे. २००६ मध्ये सुरू झालेली कंपनी महसुलाच्या आधारावर पाहिले तर ते भारतातील सर्वात मोठे रिटेलर आहे.