Lokmat Money > बिझनेस न्यूज > इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

Israel-Iran War effect on India : इराण आणि इस्रायल एकमेकांना धडा शिकवण्याच्या इराद्याने आपसात लढत राहिले, तर भारतासह जगभरातील देशांचे नुकसान होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 02:31 PM2024-10-05T14:31:43+5:302024-10-05T14:32:19+5:30

Israel-Iran War effect on India : इराण आणि इस्रायल एकमेकांना धडा शिकवण्याच्या इराद्याने आपसात लढत राहिले, तर भारतासह जगभरातील देशांचे नुकसान होणार आहे.

israel iran war effect on india refine oil petrol diesel gold rate price jumped basmati rice tea business | इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

Israel-Iran War effect on India : इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आता पेटला आहे. यातच इस्रायलच्या या कारवाईमुळे इराणचा तीळपापड झाला असून, गेल्या चार दिवसांपूर्वी इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांसह जोरदार हल्ला चढवला. आता इस्रायलने इराणला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाचा तणाव जगभर दिसून येत आहे. 

इस्रायल आणि इराण हे दोघेही एकमेकांना उद्ध्वस्त करण्याबाबत भाष्य करत आहेत. इस्रायलकडून हवाई हल्ले झाले तर इराण बदला घेण्याची एकही संधी सोडणार नाही. इराण आणि इस्रायल एकमेकांना धडा शिकवण्याच्या इराद्याने आपसात लढत राहिले, तर भारतासह जगभरातील देशांचे नुकसान होणार आहे. या युद्धाच्या झळा भारतालाही बसणार आहेत. या युद्धाचा थोडासा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. शेअर बाजारात पहिल्यांदा सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला. युद्धाच्या आगीचा तडाखा केवळ शेअर बाजारालाच नाही तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे.
  
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम भारतावर होऊ शकतो. या युद्धामुळे भारताचे हजारो कोटींचे नुकसान होऊ शकते. देशाची अर्थव्यवस्थाच नव्हे तर सर्वसामान्यांच्या अडचणी वाढू शकतात. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतातील अनेक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, ज्याचा परिणाम किमतींवर होईल, म्हणजेच देशातील त्या वस्तूंची उपलब्धता आणि किंमतीवर परिणाम होऊ शकतो. या युद्धामुळे इस्रायल किंवा इराणमधून आयात होणारे सूर्यफूल तेल, कच्चे तेल, सोने इत्यादी वस्तूंच्या किमती वाढू शकतात.

स्वयंपाकघरातील बजेटवर परिणाम होणार
मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.२२ टक्क्यांनी वाढून ७२.१४ डॉलर प्रति बॅरल झाले आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या म्हणजे त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होतो. कारण भारत कच्च्या तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. भारताच्या आयातीतील सर्वात मोठा वाटा रशियाचा आहे. मात्र, याशिवाय इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेकडून तेल खरेदी केले जाते. या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या की, भाज्या, डाळी, फळे आणि फुलांच्या किमती वाढतात, याचा अर्थ तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटवर परिणाम होतो.

व्यावसायिकांना फटका बसणार!
इस्रायल-इराण युद्धामुळे तांदूळ पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. भारत इराणला एकूण १९ टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो. या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारतीय व्यावसायिकांना फटका बसणार आहे. चहाच्या व्यापाऱ्यांवरही असाच परिणाम दिसून येतो, कारण भारतातून मोठ्या प्रमाणात चहा इराणला पाठवला जातो. २०२३-२४ या वर्षात भारताने इराणला ३२ मिलियन डॉलर्सचा चहा निर्यात केला. या युद्धामुळे पुरवठा खंडित होण्याचा परिणाम दिसू शकतो. त्याचप्रमाणे भारत इराणकडून सूर्यफूल तेल आयात करतो. युद्धामुळे निर्यात समस्यांमुळे भारतात सूर्यफूल तेलाच्या किमती वाढू शकतात.

सोन्याच्या दरात वाढ!
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्यामध्ये वाढ झाल्याने सामान्यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण सोने ही नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशा परिस्थितीत, युद्धाच्या काळात केवळ खाद्यपदार्थांचीच नव्हे तर सोन्याची मागणीही वाढते. सामान्य गुंतवणूकदारांपासून ते मोठ्या देशांपर्यंत, ते सोने खरेदी करू लागतात जेणेकरून ते अडचणीच्या वेळी तारण म्हणून वापरता येईल. या युद्धामुळे सोन्याचे भाव सातत्याने वाढू लागले आहेत. सोन्याचा भाव ७८,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मात्र, आगामी काळात सोने ८०,००० रुपये प्रति १० ग्रॅम ओलांडू शकते असे म्हटले जात आहे.

Web Title: israel iran war effect on india refine oil petrol diesel gold rate price jumped basmati rice tea business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.