ISRO Aditya L1 Sun Mission: चंद्रयान ३ च्या अभूतपूर्व यशानंतर काही दिवसांतच इस्रोने अंतराळ संशोधन क्षेत्रात आणखी एका महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आखलेल्या मोहिमेतील आदित्य एल-१ या अंतराळयानाने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या झेप घेतली. पीएसएलव्ही सी-५७ च्या मदतीने आदित्य एल-१ सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. अंतराळात सुमारे १२५ दिवस प्रवास केल्यानंतर हे यान सूर्याजवळच्या लंग्राज-१ पॉईटवर पोहोचणार आहे.
आदित्य एल-१ हे काही काळ पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण केल्यानंतर सूर्याच्या दिशेने झेप घेणार आहे. सूर्याजवळचा लंग्राज-१ पॉइंट सूर्यापासून १५ लाख किमी अंतरावर आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर हे तब्बल १५ कोटी किमी एवढं प्रचंड आहे. त्यापैकी, एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ यान एल-१ बिंदूवर जाईल. इस्रोच्या आदित्य एल-१ मोहिमेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा बुस्ट मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल
इस्रोने चंद्रयान ३ मोहीम यशस्वी करून दाखवल्यानंतर जगात भारताचा दबदबा वाढला आहे. चंद्रयान ३ मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. इस्रोची आदित्य एल-१ सौर मोहीम यशस्वी झाल्याच त्याचा मोठा उपयोग भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जगभरातील अनेक देश किफायतशीर अंतराळ मोहिमा करण्यासाठी भारताशी करार करू शकतात. भारताच्या या क्षमतेचा फायदा अनेक देशांना होऊ शकतो. इस्रो आता व्यावसायिक लॉन्चिंगसाठी पावले उचलत आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. तसेच भारत सरकार तंत्रज्ञानाच्या विकासाकडे खूप लक्ष देत आहे. अशा परिस्थितीत अशा मोहिमेच्या यशामुळे भारताला मोठा दिलासा मिळणार आहे. देशातील अंतराळ आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक स्टार्टअप्सना याचा फायदा होऊ शकतो. तसेच या क्षेत्रात उत्कृष्ट संधी मिळू शकतात, असेही म्हटले जात आहे.
भारत आणखी एक इतिहास घडवू शकतो
भारताचे आदित्य एल १ हे चीनच्या मिशनपेक्षा अनेक प्रकारे वेगळे आहे. चीनने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी नॅशनल स्पेस सायन्स सेंटरमधून यान लाँन्च केले होते. आदित्य एल १ शी तुलना केली तर सर्वांत मोठा फरक म्हणजे चीनच्या यानाचे वजन ८५९ किलो आहे. तर आदित्य एल-१ फक्त ४०० किलोचा असल्याचे सांगितले जात आहे. आहे. आदित्य एल-१ आणि चीनच्या यानाचे पृथ्वीपासूनचे अंतर महत्त्वाचे ठरणार आहे. चीनचे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत आहे, तर इस्रोचे आदित्य एल १ पूर्णपणे बाहेर असेल. त्यामुळे चीन जे करू शकला नाही ते भारत करणार आहे, असे म्हटले जात आहे.
आदित्य-एल १ बजेट किती होते?
चांद्रयान ३ प्रमाणे इस्रोने सूर्याभ्यास मोहिमेचे बजेट चीन आणि अमेरिकेपेक्षा कमी ठेवले आहे. संपूर्ण जगाचे याकडे लक्ष लागले आहे. इस्रोच्या सूर्याभ्यास मोहीम बजेटबाबत जगभरात चर्चा सुरू आहे. चीनने नुकतेच आपले मिशन लाँच केले होते. त्यासाठी कोट्यवधींचे बजेट वापरले. तर, दुसरीकडे भारताने फक्त ४०० कोटी रुपयांच्या बजेटसह आदित्य एल-१ तयार केले आहे. प्रक्षेपण खर्च वगळून इस्रोने या मिशनसाठी ३७८.५३ कोटी रुपयांचे बजेट तयार केले आहे. मात्र, यामध्ये लॉन्चिंगच्या खर्चाचा समावेश नाही. प्रक्षेपण खर्चाचा समावेश केल्यास तो सुमारे ४०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. आदित्य L1 चा L1 लॅग्रेंज पॉइंट १ चे प्रतिनिधित्व करतो. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील दोन महत्त्वाच्या बिंदूंपैकी हा एक आहे. त्यामुळे सूर्याविषयी माहिती मिळण्यास मदत होणार आहे.