Join us

५जी चाचण्यांसाठी नियमावली जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 6:02 AM

४०० एमएचझेड रेडिओ लहरी वितरित करणार

नवी दिल्ली : उपलब्ध असलेल्या सर्व स्पेक्ट्रम बँडमध्ये ५जी चाचण्या घेण्यासाठी दूरसंचार विभागाने मार्गदर्शक सूचना (गाईडलान्स) जारी केल्या आहेत. त्यासाठी ४०० एमएचझेड रेडिओ लहरी वितरित केल्या जाण्याचीही शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, चाचणी परवान्यासाठी ५ हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. त्याची वैधता ३ महिने ते २ वर्षे असेल. चाचणी कोणत्या कारणासाठी घेतली जात आहे, त्यावर मुदत अवलंबून असेल.

२३ जुलै रोजी जारी झालेल्या नियमावलीनुसार, तंत्रज्ञानविषयक क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी ५जी सेवा चाचण्या घेण्यात येणार आहेत.सूत्रांनी सांगितले की, या वर्षाच्या अखेरपर्यंत ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची सरकारची योजना आहे. २०२० पर्यंत ५जी तंत्रज्ञानाची व्यावसायिक सेवा देशात सुरू करता येईल, असा प्रयत्न आहे. संशोधन व विकास, उत्पादन, दूरसंचार परिचालन आणि शैक्षणिक कार्य यात सहभागी असलेल्या भारतीय संस्थांना ५जी चाचण्यांचे परवाने देण्यात येतील. परवान्यांची मुदत दोन वर्षांपर्यंत असेल. परवाने नूतनीकरणीय असतील. चाचण्यांचे परवाने देण्यासाठी विभागाने स्वत:लाच ४ ते ८ आठवड्यांची मुदत घालून घेतली आहे. मुदत संपल्यानंतर दूरसंचार विभागाने प्रतिसाद न दिल्यास अर्जदार चाचण्यांची थेट सूचना विभागाला पाठवू शकेल, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :ऑनलाइनइंटरनेट