बंगळुरू : आयटी कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात कर्मचारी कपात हाती घेतल्यामुळे आपल्या हितांच्या रक्षणासाठी आयटी कर्मचारी स्वत:ची कामगार संघटना स्थापन करीत आहेत. ‘फोरम फॉर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज’ (एफआयटीई) या आयटी व्यावसायिकांच्या संघटनेलाच कामगार संघटनेच्या स्वरूपात नोंदणीकृत करण्यात येणार आहे.फोरमच्या उपाध्यक्ष वसुमती यांनी सांगितले की, संस्थेची कामगार संघटना म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. ही देशातील आयटी कर्मचाऱ्यांची पहिली संघटना असेल. येत्या पाच महिन्यांत नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन संघटना अस्तित्वात येईल.एफआयटीई हा आयटी कर्मचाऱ्यांचा एक समूह असून २00८ मध्ये श्रीलंकेतील तामिळी नागरिकांच्या हक्कासाठी आंदोलन केल्यामुळे तो विशेष चर्चेत आला होता. हा गट सध्या आॅनलाईन काम करतो. त्याचे १ हजार सदस्य आहेत. त्यापैकी सुमारे १00 सदस्य सक्रिय आहे. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, मुंबई, कोची आणि दिल्ली यासह नऊ शहरांत त्याच्या शाखा आहेत. या आधी या समूहाने आयटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक आंदोलने केली आहेत.विविध संस्थांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येती काही वर्षे आयटी कंपन्या दरवर्षी सुमारे १.७५ लाख ते २ लाख कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे ५0 ते ६0 टक्के कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. हे आयटी कंपन्यांसमोरील मोठे आव्हान आहे, असे या जाणकारांचे मत आहे. वसुमती यांनी सांगितले की, तंत्रज्ञान बदलाचा आढावा घेऊन त्यानुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे हे कंपन्यांचेच काम आहे. ते न करता कंपन्या आपला नफा वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकीत आहेत. त्यासाठी अॅप्रायजल (कर्मचारी मूल्यमापन) व्यवस्थेचा गैरवापर केला जात आहे. ‘काम समाधानकारक नाही’, असे कारण दाखवून कर्मचाऱ्यांना काढले जात आहे.
आयटी कर्मचाऱ्यांचीही आता संघटना
By admin | Published: May 25, 2017 1:02 AM