नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसमुळे देशातील प्रत्येक वर्किंग सेक्टरमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली होती. त्यामुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. मात्र, आता आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आहे. कोरोनाच्या संकटातून सावरलेल्या टेक कंपन्यांनी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
स्टाफिंग फर्म एक्सफेनो (Xpheno) च्या रिपोर्टनुसार, आयटी कंपन्या आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त लोकांची भरती झाली होती. आयटी क्षेत्राशी निगडीत असलेल्या सुमारे 1 लाख लोकांना ऑक्टोबरमध्ये रोजगार मिळाला, अशी माहिती हॉट टेक जॉब्स आणि हॉट स्किल्स Indian Unicorns & Soonicorns च्या रिपोर्टमधून समोर आली आहे.
मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये होत आहे भरती
आयटी क्षेत्रातील मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उदाहरणार्थ, गेल्या ऑक्टोबरमध्ये एक्सेंचर कंपनीत 3000 जागा होत्या. आता त्यामध्ये वाढ होऊन 7000 एवढी संख्या झाली आहे. IBM मध्ये ज्युनिअर लेव्हलच्या पोस्टसाठी 1725 जागा उपलब्ध आहेत. विप्रो कंपन्यांमध्ये 800 जागा उपलब्ध आहेत. एक्सफेनोच्या रिपोर्टनुसार कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहेत ते जाणून घेऊया...
फुल स्टॅक डेव्हलपर
फुल स्टॅक डेव्हलपर पदासाठी प्रोग्रामिंगच्या भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच React.JS [Redux]आणि Angular.JS फ्रंट एंड आणि बॅक एंड सारख्या Node.JS ची माहिती असणे आवश्यक आहे. या पदांवर काम करणाऱ्या फ्रेशर्सना वर्षाला 4-6 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं तर 12 वर्षांच्या अनुभवी व्यक्तींना 40-80 लाख रुपयांपर्यंत कमवण्याची संधी आहे.
डेटा इंजिनिअर्स
Hadoop सारख्या डेटा फ्रेमवर्कवर काम करण्यासाठी इंजिनिअर्सना पायथॉन आणि आरसारख्या प्रोग्रामिंग भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामध्ये काम करणाऱ्या फ्रेशरला वर्षभरात 4 -6 लाख कमवण्याची संधी आहे. तर 3 वर्षांपर्यंत अनुभव असणारी व्यक्ती वर्षाला 14 ते 15 लाखांच्या घरात पैसे कमवू शकते. तर 12 वर्षांचा अनुभव असणाऱ्या डेटा इंजिनिअर्सना 70 लाखांपर्यंत कमवण्याची संधी आहे.
क्लाऊड कॉम्प्युटरिंग
कोरोना संकट काळात क्लाऊड कॉम्प्युरिंग मार्केटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. क्लाउड आणि नवीन एज टेक्नॉलॉजीमुळे येणाऱ्या काळात फर्मच्या विकासात वाढ होईल, असे विप्रोचे सीईओ डेलपॉर्टे यांनी म्हटले आहे. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, अझर आणि गुगल क्लाऊड सारखे प्लॅटफॉर्म सध्या बंपर भरती सुरु आहे. क्लाउड प्रोफेसर दर वर्षी 4 लाख ते 35 लाख रुपयांपर्यंत कमावू शकतात.
सायबर सिक्युरिटी प्रोफेसनल
कोरोना संकट काळात वर्क फ्रॉम होम करताना सायबर सुरक्षेची आवश्यकताही वाढली असून यासह या क्षेत्रातील प्रोफेसनल्स गरज वाढली आहे. या क्षेत्रात ट्विटर आणि पे यू सारख्या कंपन्यांमध्येही भरती झाली आहे. सायबर सिक्युरिटी प्रोफेसनल हे अनुभवाच्या जोरावर 4 लाख ते 4 कोटी रुपये मिळवू शकतात.