प्रसाद गो. जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
विविध देशांच्या बँकांनी आपले धोरण जाहीर केल्यानंतरही बाजारातील विक्री कमी होत नसून, कोरोनाच्या नवीन विषाणूची भीती आणि गुंतवणूकदारांची नफा कमाई यामुळे जगभरातील शेअर बाजार खाली आहे. मात्र, या परिस्थितीमध्येही भारतीय बाजारामध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये तेजी दिसून आली. बाजाराचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगामध्ये बंद झाले असले तरी आयटी निर्देशांक हा त्याला अपवाद ठरला आहे. केवळ हाच निर्देशांक २ टक्क्यांनी वाढला आहे.
गतसप्ताहात अमेरिका, जपान, युरोप आणि इंग्लंडचे पतधोरण जाहीर झाले. त्याचा फायदा भारतामधील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना मिळणार असल्यामुळे या कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी आल्याचे दिसून आले.
भांडवल मूल्यामध्ये ८.३० लाख कोटींचा फटका
- गतसप्ताहामध्ये शेअर बाजारातील घसरणीचा जबरदस्त फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. या सप्ताहामध्ये बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य ८,३०९८६.७४ कोटी रुपयांनी कमी होऊन २,५९,३७,२७७.६६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
- या महिन्यामध्ये परकीय वित्त संस्था या विक्री करताना दिसून आल्या तर देशी वित्त संस्थांची खरेदी सुरू आहे. गतसप्ताहात या संस्थांनी अनुक्रमे १०,४५२.२७ कोटी रुपयांची विक्री व ६,३४१.१४ कोटी रुपयांची खरेदी केलेली आढळून आली. महिन्याचा विचार करता परकीय वित्त संस्थांनी २६,६८७.४६ कोटी रुपयांचे भांडवल मोकळे केले आहे. त्याचवेळी देशांतर्गत वित्त संस्थांनी २०,०४१.९४ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत.
- आगामी सप्ताहामध्ये कोरोनाचा प्रसार आणि जगभरातील शेअर बाजारांमधील वातावरण हेच बाजाराची दिशा ठरवेल.