लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या काळात अनेकांच्या नाेकऱ्यांवर संकट आले. मात्र, २०२१ वर्षात चांगली राेजगार निर्मिती झाली आहे. विशेषत: ‘आयटी’ क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर नाेकरभरती झाली आहे. हाच ट्रेंड कायम राहणार असून देशातील बड्या आयटी कंपन्या यावर्षी तब्बल १ लाखांहून अधिक नाेकरभरतीच्या तयारीत आहेत. त्यात नवख्यांना जास्त संधी मिळणार आहेत.
गेल्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी ४५ टक्के अधिक नाेकरभरती केली आहे. हाच कल नव्या आर्थिक वर्षात कायम राहणार असल्याचे चित्र आहे. टीसीएस, इन्फाेसिस, विप्राे, एचसीएल या कंपन्या यात आघाडीवर आहेत. नाेकरभरतीमध्ये फ्रेशर्सना प्राधान्य देण्यात येत आहे.
नाेकरभरतीसाेबतच कंपन्या कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी भरघाेस पगारवाढ आणि बाेनसही देण्यात येत आहे.
मागणी वाढण्याचे कारण
काेराेनामुळे देशभरात ‘वर्क फ्राॅम हाेम’ संकल्पना रूढ झाली. अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करावे लागले. त्यामुळे विविध उद्याेगांच्या कामाचे डिजिटलाजेशन करून कर्मचाऱ्यांना घरून काम करता येईल, असे तंत्रज्ञान विकसित करावे लागले. परिणामी या क्षेत्रात मागणी वाढली आहे. आयटी कंपन्यांना त्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे.