- सी. ए. उमेश शर्मा
(करनीती - भाग २६०)
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीआर ९ ए हा कोणता फॉर्म आहे ?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, जीएसटीआर ९ ए हा जुलै २०१७ ते मार्च २०१८ वर्षासाठी कंपोझिशन करदात्याद्वारे भरावयाचा वार्षिक रिटर्नचा फॉर्म आहे. यात करदात्याला आर्थिक वर्षात दाखल केलेल्या सर्व त्रैमासिक रिटर्नमधील तपशील द्यावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर ९ ए कोणाकोणाला दाखल करावा लागेल आणि याची देय तारीख काय आहे?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर ९ ए हा फॉर्म फक्त कंपोझिशन करदात्याद्वारे दाखल केला जाईल. जीएसटीआर ९ ए हा फॉर्म पुढील आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत दाखल करावा लागेल. उदा. जर करदात्याला आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी जीएसटीआर ९ ए दाखल करायचा असेल, तर त्याची देय तारीख ३१ डिसेंबर, २०१८ असेल.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर ९ ए मध्ये करदात्याला कोणता तपशील द्यावा लागेल?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर ९ ए मध्ये ५ भाग आहेत, त्यात पुढील माहिती द्यावी लागेल.
भाग १ - जीएसटीआयएन, करदात्याचे कायदेशीर नाव, व्यापाराचे नाव, मूलभूत तपशील स्वयंनिर्मित होईल.
भाग २ - यात त्रैमासिक जीएसटीआर ४ मध्ये दाखल केलेला आवक आणि जावक पुरवठ्याचा तपशील द्यावा लागेल. यात आर्थिक वर्षात दाखल केलेल्या सर्व रिटर्न्सचा सारांश दिला जाईल.
भाग ३ - आर्थिक वर्षामध्ये रिटर्न्स मध्ये घोषित केलेल्या कराचा तपशील द्यावा लागेल. यात सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, सीईएसएस, अशा वेगवेगळ्या शिर्षकांतर्गत भरलेल्या कराचा उल्लेख करावा लागेल.
भाग ४ - यात आर्थिक वर्षाशी संबंधित काही व्यवहार जर पुढील आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबरमध्ये केलेले असतील, तर त्याचा तपशील द्यावा लागेल. यात मागील वर्षातील सुधारणांचाही समावेश होतो.
भाग ५ - यात इतर तपशील द्यावा लागेल जसे की,
अ) मागणी आणि परताव्याचा तपशील.
ब) रिव्हर्स केलेला किंवा वापर केलेल्या क्रेडिटचा तपशील.
क) भरलेली किंवा देय असलेली लेट फी.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर ९ ए दाखल करण्यास उशीर झाला, तर करदात्याला काही लेट फी भरावी लागेल का?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर ९ ए देय तारखेपर्यंत दाखल केले नाही, तर रु. १०० सीजीएसटी आणि रु. १०० एसजीएसटी प्रतिदिन अशी लेट फी भरावी लागेल, परंतु लेट फी ही राज्याच्या उलाढालीच्या ०.२५ टक्के मर्यादित असेल.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर ९ए हे रिटर्न रिव्हाइज करता येत नाही. जो तपशील करदात्याने त्रैमासिक रिटर्नमध्ये दाखल केलेला आहे, तोच जीएसटीआर ९ए मध्ये टाकावा लागेल. म्हणजेच आधीच्या रिटर्न्समध्ये त्या सुधारता येणार नाहीत. मग करदात्यांनी वार्षिक रिटर्न दाखल करून काय फायदा?
‘जीएसटीआर-९-ए’चे वार्षिक रिटर्न ३१ डिसेंबरपूर्वी भरणे अनिवार्य
जीएसटीआर ९ ए हा जुलै २०१७ ते मार्च २०१८ वर्षासाठी कंपोझिशन करदात्याद्वारे भरावयाचा वार्षिक रिटर्नचा फॉर्म आहे. यात करदात्याला आर्थिक वर्षात दाखल केलेल्या सर्व त्रैमासिक रिटर्नमधील तपशील द्यावा लागेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:33 AM2018-11-19T02:33:37+5:302018-11-19T02:34:05+5:30