नवी दिल्ली- देशातील काही भागात एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याचं समोर आल्यानंतर प्राप्तिकर विभागानं रोकड साठवणा-यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. प्राप्तिकर विभागानं याच दिशेनं पाऊल टाकत कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाबसारख्या विविध भागांत छापेमारी करत 14.48 कोटी रुपये रोकड जप्त केली. सूत्रांच्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागानं व्यक्ती आणि व्यापा-यांच्या ठिकाणांवर छापे मारले होते.जप्त करण्यात आलेल्या 14.48 कोटी रुपयांच्या रोकडमध्ये 2000 रुपये आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. हैदराबादेतल्या रिअल इस्टेट व्यावसायिकांच्या इथे छापेमारीत 5.10 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. तसेच पंजाबमधल्या खन्ना जिल्ह्यातही केलेल्या छापेमारीत 5.62 कोटी रुपये जप्त केले आहेत. कर्नाटकातल्या पीडल्ब्यूडीच्या ठेकेदारांकडूनही पैसे जप्त करण्यात आले आहेत. या ठेकेदारांना जानेवारी-मार्चदरम्यान ठेके देण्यात आले होते.विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात रोकड जमा करण्याच्या प्रकाराला महत्त्व प्राप्त झालं आहे. गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागानं म्हैसूर आणि बंगळुरूमध्ये डझनांहून अधिक ठेकेदारांच्या घरी छापा टाकत 6.76 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रोकड बेनामी लॉकरमधून जमा करण्यात आली आहे. तसेच या रोकडमध्ये 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.
रोख तुटवड्यावर आयटी विभागाची कारवाई, 14 कोटींहून अधिक रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 8:40 AM