Join us

‘जेट’च्या रद्द तिकिटाचे पैसे लवकर परत मिळणे कठीण, गुंतागुंत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 3:55 AM

बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या ग्राहकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे लवकर परत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

मुंबई : बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या ग्राहकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे लवकर परत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. नादारी व दिवाळखोरी प्रक्रियेसाठी कंपनीविरुद्ध राष्ट्रीय कंपनी लवादात अर्ज दाखल झाल्यामुळे तिकिटाचे पैसे परत मिळविण्याचा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा झाला आहे.सबिना गोमेज यांनी जानेवारीत जेटच्या वेबसाइटवरून सिंगापूरची चार परतीची तिकिटे ८२,४०० रुपयांना बुक केली होती. १० मे रोजी त्यांचे कुटुंब सहलीवर जाणार होते. तथापि, त्याआधीच जेट एअरवेज बंद पडली. त्यामुळे सबिना यांना ही तिकिटे रद्द करून घ्यावी लागली. त्यांचे पैसे त्यांना अजूनही मिळालेले नाहीत. हॉटेल्स आणि इतर सेवांची बुकिंग झालेली असल्यामुळे त्यांना दुसऱ्या कंपनीकडून ऐनवेळी तिकिटे खरेदी करावी लागली. त्यासाठी त्यांना १ लाख रुपयांचा वेगळा भुर्दंड पडला. गोमेज यांच्यासारखे असंख्य ग्राहक जेटकडून तिकिटाचे पैसे परत मिळण्याची वाट पाहत आहेत.सूत्रांनी सांगितले की, कार्डद्वारे पैसे अदा करणारे ग्राहक बँकांकडे पैसे परत मागू शकतात. व्यावसायिक करारानुसार, न मिळालेल्या सेवांचे पैसे सेवादारांच्या खात्यातून ग्राहकांच्या खात्यात टाकण्याचा हक्क बँकांना आहे. तथापि, दिवाळखोरी अर्ज दाखल करून घेताना राष्ट्रीय कंपनी लवादाने सर्वच देयकांवर (पेमेंट) बंदी घातल्यामुळे हा पर्याय खुला आहे की नाही, याबाबत संभ्रम आहे.एका प्रवासी संस्थेने सांगितले की, १७ एप्रिलच्या आधी परताव्याचे दावे दाखल करणाºया ट्रॅव्हल एजंटांना १०० टक्के पैसे परत मिळाले आहेत. हे पैसे त्यांनी ग्राहकांना द्यायला हवेत; पण ते त्यांनी दिलेले आहेत की नाहीत, याची माहिती मिळवणे कठीण आहे.जगभरातून आले दावे१७ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाने (आयटा) जेट एअरवेजची बिलिंग व सेटलमेंट प्लॅन सेवा खंडित केली. आयटाने एजंटांना परताव्यांचे आॅफलाइन दावे दाखल करण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला होता. त्यानंतर जेटकडे जगभरातून दावे आले. अनेकांनी प्रत्यक्ष देय रकमेपेक्षा जास्त रकमेचे दावेही दाखल झालेले असू शकतात. याची शहानिशा करण्याची जबाबदारी जेट एअरवेजची आहे. तथापि, जेटचे कामकाज तर बंद झालेले आहे. त्यामुळे हा प्रश्न अधांतरीच आहे.

टॅग्स :जेट एअरवेज