नवी दिल्ली :
प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी उद्योग समूहाने सोमवारी २०१९ पासून आपल्या कंपन्यांना हिस्सेदारी विक्रीतून मिळालेल्या २० हजार कोटी रुपयांचा (२.८७ अब्ज डॉलर्स) तपशील जाहीर केला. यातील २.५५ अब्ज डॉलरचा निधी पुन्हा व्यवसायात लावण्यात आला असल्याचे समूहाने म्हटले आहे.
अदानी समूहात बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपये आले असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने केला आहे. त्यास उत्तर म्हणून अदानी समूहाने ही माहिती जाहीर केली असल्याचे मानले जात आहे. समूहाने जारी केलेल्या तपशीलानुसार, अबूधाबी स्थित जागतिक रणनीतिक गुंतवणूक संस्था इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीसारख्या (आयएचसी) गुंतवणूकदारांनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल) यांसारख्या समूहातील कंपन्यांत २.५९३ अब्ज डॉलरची (सुमारे २० हजार कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. प्रवर्तकांनी अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि एजीईएलमधील हिस्सेदारी विकून २.७८३ अब्ज डॉलर उभे केले आहेत. हा निधी नवीन व्यवसायात, तसेच अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी पाॅवर लिमिटेड यांसारख्या कंपन्यांच्या वृद्धीला गती देण्यासाठी प्रवर्तक संस्थांनी पुन्हा गुंतविला.
‘बेनामी कंपन्या’चाही केला खुलासा जानेवारी २०२१ मध्ये प्रवर्तकांनी एजीईएलमधील २० टक्के हिस्सेदारी फ्रान्सची कंपनी टोटल एनर्जीला विकून दोन अब्ज डॉलर उभे केले. त्याआधी अदानी टोटल गॅस लिमिटेडमधील ३७.४ टक्के हिस्सेदारी याच फ्रेंच कंपनीला ७८.३ कोटी डॉलरला विकली होती.
टोटल एनर्जीने अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी प्रवर्तकांच्या विदेशी गुंतवणूक कंपन्या खरेदी केल्या. विदेशातून मिळालेला निधी समूहातील कंपन्यांत परत आणण्यात आला. त्यांनाच आता काही लोक ‘बेनामी कंपन्या’ म्हणत आहेत.