Join us

आयटी नोकरभरती सुस्तावली; कर्मचाऱ्यांवरील खर्चात कंपन्यांकडून घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 7:42 AM

कर्मचाऱ्यांवरील खर्चात कंपन्यांकडून घट, मागणीअभावी हातांना नाही काम

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आयटीमध्ये नोकरी म्हणजे देशात आणि जगातही सन्मान, बक्कळ पैसा असे चित्र गेली काही वर्षे दिसत होते. यामुळे हजारो तरुणांना परदेशात नोकरीची, तसेच तिथे स्थायिक होण्याची संधी मिळाली, परंतु सध्या चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय आयटी कंपन्यांमध्ये सातत्याने सुरू असलेली कर्मचारी भरती सुस्तावलेली दिसत आहे. 

सप्टेंबर तिमाहीत आयटीतील कर्मचाऱ्यांवर केला जाणारा खर्च मागील दहा तिमाहींच्या तुलनेत सर्वात कमी होता. सध्या बाजारात मागणी नसल्याने आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च घटू लागला आहे, तसेच कंपन्यांमधील कर्मचारी भरतीही मंदावल्याचे दिसत आहे. आयटी क्षेत्रामध्ये नकारात्मक चित्र दिसत असताना ऑटोमोबाइलमध्ये कार्यरत असलेल्यांची स्थिती चांगली असल्याचे दिसतेय 

फायनान्स, ऑटो आघाडीवर कर्मचाऱ्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या बाबतीत आयटीला फायनान्शियल आणि ऑटो या क्षेत्रांनी मागे टाकले आहे, असे सप्टेंबर तिमाहीतील आकडेवारीवरून दिसते. कॅपिटल गुड्स आणि धातू उद्योगही पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत.

महसुलातही घट

nपरदेशी ब्रोकरेज फर्म ‘जेफरिज’नुसार, कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च १२.८ टक्क्यांनी वाढला तरी मागील १० तिमाहींच्या तुलनेत ही वृद्धी सर्वात कमी आहे. 

nकंपन्यांच्या महसूल वृद्धीमध्ये ०.३ टक्क्यांची घट दिसून आली आहे. कर्मचारी संख्येत घट झाल्याने आयटीतील स्थिती कमजोर दिसत आहे. 

निम्मा खर्च होतो कर्मचाऱ्यांवरच

या तिन्ही कंपन्या कमाईतील निम्म्यापेक्षा अधिक खर्च आपल्या कर्मचाऱ्यांवर करतात. याप्रमाणेच इतरही अनेक कंपन्यांच्या उत्पन्नात सातत्याने घट झाली आहे, पण सध्या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांवरील होणारा खर्च कमी केलेला दिसत आहे. 

कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट 

७,५३० जणांची घट सप्टेंबर तिमाहीत इन्फोसिसच्या एकूण कर्मचारी संख्येत नोंदविली गेली.  

६,३३३ कर्मचाऱ्यांची घट टाटा कन्सल्टन्सीच्या नोकरदारांच्या संख्येत नोंदविली गेली.

२,३९९ जणांची घट एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीच्या कर्मचारी संख्येत नोंदविली आहे. 

टॅग्स :व्यवसायइन्फोसिसनोकरी