नवी दिल्ली : आयटी क्षेत्राला यंदा असंख्य समस्यांचा सामना करावा लागत असून, त्याचा परिणाम म्हणून या क्षेत्रातील वेतनवाढ यंदा २ टक्क्यांनी घटेल असा अंदाज आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांना ६ टक्क्यांच्या आसपास वेतनवाढ मिळेल, असाही अंदाज आहे. गेल्या वर्षी १0 टक्क्यांच्या आसपास वेतनवाढ मिळाली होती.
१५0 अब्ज डॉलरचे आयटी क्षेत्र एकेकाळी सर्वाधिक आकर्षक क्षेत्र होते. यंदा परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे. आयोन हेविट इंडियाचे भागीदार आनंदोरूप घोस यांनी सांगितले की, यंदा उद्योग प्रचंड दबावात आहे. अमेरिकेने एच-१ बी व्हिसावर घातलेली बंधने बाजूला काढली तरी, स्थिती समाधानकारक नाही. गेल्या तीन तिमाहीतील आकडे पाहिले तरी स्थितीची कल्पना येते. गेल्या वर्षीसारखी कामगिरी करणे कंपन्यांना अवघड जात आहे.
आयटी क्षेत्रात आॅटोमेशनने विस्तारावर मर्यादा आणल्या आहेत. अमेरिकेतील सबप्राईम संकटानंतर १९ टक्क्यांवर असलेले विस्ताराचे प्रमाण यंदा ८ टक्क्यांवर येईल, असा अंदाज आहे. कंपन्यांचे वेतन बिलही वाढतच आहे. भारतीय आयटी कंपन्यांचा मोठा व्यवसाय आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून होतो. अमेरिका आणि युरोपातूून हा व्यवसाय येतो. तेथील राजकीय अस्थिरतेमुळे हा व्यवसाय घटला. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी नागरिकांना नोकऱ्या देण्यावर बंधने आणल्याचा फटका बसला आहे, तो वेगळाच. बहुतांश कंपन्यांची वाढ एक अंकी झाली आहे.
सूत्रांनी सांगितले की, इन्फोसिसमधील वेतनवाढ यंदा घसरेल. वरिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांना त्याचा जास्त फटका बसेल. गेल्या वर्षी कंपनीने सरासरी ८ टक्के वेतनवाढ दिली होती. यंदा २ ते ६ टक्के वेतनवाढ मिळू शकेल. याशिवाय यंदाही वेतनवाढ काही महिने पुढे ढकलली जाईल. गेल्या वर्षी ६ टक्के वेतनवाढ देणारी आऊट सोर्सिंग
कंपनी एम्फासिसच्या व्यवस्थापनाने सांगितले की, यंदा वेतन कपात होणार नाही, तथापि, वाढ फारच थोडी असेल. (वाणिज्य प्रतिनिधी)
आयटीतील वेतनवाढ खुंटणार!
आयटी क्षेत्राला यंदा असंख्य समस्यांचा सामना करावा लागत असून, त्याचा परिणाम म्हणून या क्षेत्रातील वेतनवाढ यंदा २ टक्क्यांनी घटेल असा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 07:07 AM2017-02-13T07:07:57+5:302017-02-13T07:07:57+5:30