नवी दिल्ली - आपण दुकानात खरेदीसाठी गेलो किंवा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो तर बिल देताना दुकानदारांकडून ग्राहकांना मोबाईल नंबर मागितला जातो. गरज नसतानाही आपल्याला त्यांनी मागितल्यामुळे मोबाईल नंबर द्यावा लागतो. आपणही सहजपणे नंबर देऊन टाकतो. मात्र, आता बिल घेण्यासाठी कुठल्याही दुकानदाराला मोबाईल नंबर देण्याची गरज भासणार नाही. कारण, ग्राहक मंत्रालयाकडून दुकानदार किंवा विक्रेत्यांच्या या चलनास बंद करण्याच्या सूचना देण्याच्या विचारात आहे.
दुकानात किंवा हॉटेलमध्ये खेरदीनंतर बिल देताना ग्राहकांना मोबाईल नंबर मागितला जातो. यासंदर्भात ग्राहकांच्या अनेक तक्रारी मंत्रालय व संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. ग्राहकांच्या या तक्रारीची दखल घेऊनच मंत्रालयाकडून लवकरच एक आदेश जारी केला जाणार आहे. याप्रकरणी सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर केंद्राकडून एडवायजरी जारी करण्यात येत आहे. ग्राहकांना मोबाईल नंबर मागत सक्ती करणारा विक्रेता ''अनुचित व्यापार व्यवहार'' अंतर्गत दंडास पात्र ठरतो. ग्राहकांनी मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्यास अनेक दुकानदार वा विक्रेत्यांकडून सर्व्हीस देण्यास नकार देण्यात येतो. तसेच, मोबाईल नंबर न दिल्यास ते बिल जनरेट करत नाहीत. ग्राहक संरक्षण अधिनियम अंतर्गत हा एक अनुचित आणि प्रतिबंधात्मक व्यापार चलन आहे.
भारतात ग्राहकांना खरेदी करताना किंवा हॉटेलमध्ये बिल भरताना मोबाईल नंबर देणे बंधनकार असणार नाही. मात्र, तरीही अनेकदा मोबाईल नंबर दिल्याशिवास संबंधित सेवा मिळत नाही. मात्र, सेल्सपर्सन हे गाहकांना मोबाईल नंबर देण्याची सक्ती करू शकत नाहीत. ग्राहकांच्या हितासंदर्भातील मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी खुदरा उद्योग आणि CII, FICCI आणि ASSOCHAM यांसारख्या संस्थांना सल्ला देण्यात येणार आहे.