चेन्नई : आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसपाठोपाठ कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्सने अमेरिकेतील स्थानिक तरुणांची भरती वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेतील स्थानिक भरती वाढल्यामुळे भारतीय तरुणांच्या नोकऱ्यांत आपोआपच कपात होणार आहे.
कॉग्निझंट ही नॅस्डॅकमध्ये सूचीबद्ध कंपनी आहे. अमेरिकेतील स्थानिक कम्युनिटी कॉलेजांमधून तसेच व्यवस्थापन विद्यापीठांतून तरुणांची भरती करण्याची योजना कंपनीने आखली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी तरुणांच्या नोकऱ्यांत वाढ करण्यासाठी विदेशी कामगारांच्या भरतीवर नियंत्रण आणले आहे.
एच-१बी व्हिसावर बंधने आणली आहे. त्यामुळे कॉग्निझंटने यंदा एच-१बी व्हिसा अर्जात अर्ध्याने कपात केली आहे. याआधी इन्फोसिसने एच-१बी व्हिसासाठीच्या अर्जांत कपात करून १0 हजार स्थानिक अमेरिकी नागरिकांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती.
कॉग्निझंटचे मुख्य वित्त अधिकारी कारेन मॅकलॉलीन यांनी सांगितले की, कंपनीच्या सध्याच्या खर्च रचनेत सुधारणा करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. खर्चात कपात करण्यासाठी ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जावे म्हणून आम्ही गेल्याच आठवड्यात विशेष पॅकेज जाहीर केले आहे. यांसारख्या आणखी काही उपाययोजना आम्ही करणार आहोत. यंदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत आम्हाला या उपायांचा लाभ दिसून येईल. (वृत्तसंस्था)
आयटीतील नोकऱ्यांत कपातीची शक्यता!
आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसपाठोपाठ कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्सने अमेरिकेतील स्थानिक तरुणांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 12:11 AM2017-05-09T00:11:50+5:302017-05-09T00:11:50+5:30