नवी दिल्ली : आपला व्यवसाय वाढविण्यासाठी गेल्या वर्षीच आपण अॅन्टिग्वाचे नागरिकत्व घेतले आहे, असा दावा पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील एक आरोपी मेहुल चोकसी याने केला आहे. पीएनबीला ७ हजार कोटी रुपयांना फसविल्याचा आरोप चोकसीवर आहे.
कॅरेबियन देश असलेल्या अॅन्टिग्वाच्या एका दैनिकास दिलेल्या मुलाखतीत चोकसीने म्हटले की, कॅरेबियनमध्ये व्यवसाय वाढवता यावा, तसेच १३0 व त्यापेक्षा जास्त देशांत व्हिसामुक्त प्रवास करता यावा, यासाठी मी अॅन्टिग्वाकडे नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. जानेवारीमध्ये आपण उपचारासाठी अमेरिकेत होतो, असा दावा करतानाच चोकसीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. त्याने म्हटले की, गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत मी अॅन्टिग्वा आणि बारबुडा या देशांचे नागरिकत्व मिळावे यासाठी कायदेशीररीत्या अर्ज केला होता. अर्ज करताना आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींची मी पूर्तता केली. योग्य कालावधीत माझा नागरिकत्वाचा अर्ज मंजूर करण्यात आला.
सीबीआयने अॅन्टिग्वाला पत्र लिहून चोकसीची माहिती मागितली आहे. भारताची कायदेशीर विनंती विचारात घेतली जाऊ शकते, असे संकेत अॅन्टिग्वाने दिले आहेत. दरम्यान, चोकसीला देण्यात आलेल्या नागरिकत्वाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अॅन्टिग्वाच्या विरोधी पक्षांनी केली आहे.
हस्तांतरण करार नाही
या पार्श्वभूमीवर तेथील सरकारने म्हटले की, भारत आणि अॅन्टिग्वा यांच्यात गुन्हेगार हस्तांतरण करार नाही. तरीही चोकसीचे प्रत्यार्पण करण्याच्या भारताच्या वैध मागणीवर विचार केला जाईल. अॅन्टिग्वातील एका स्थानिक दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चोकसी याने नोव्हेंबर २0१७ मध्ये अॅन्टिग्वाचे नागरिकत्व घेतले, तसेच या देशाशी निष्ठा राखण्याची शपथ त्याने यंदाच्या १५ जानेवारी रोजी घेतली.
म्हणे व्यवसाय वाढीसाठी बनलो अॅन्टिग्वाचा नागरिक; चोकसीचा दावा
पीएनबीला ७ हजार कोटी रुपयांना फसविल्याचा आरोप चोकसीवर आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:24 AM2018-07-28T01:24:22+5:302018-07-28T06:03:05+5:30