Join us

चिनी यंत्रमागांवरही बहिष्कार टाकणार, देखभाल खर्च यामुळे वापर कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 2:51 AM

हे माग काहीसे स्वस्त असले तरी ते टिकाऊ नसतात आणि त्यांच्या देखभालीसाठी अधिक खर्च येत असल्यामुळे त्यांचा वापर कमी होत आहे.

सोलापूर/इचलकरंजी/मालेगाव/ भिवंडी : राज्यातील हातमाग आणि यंत्रमागाची प्रमुख केंद्रे असलेल्या शहरांमध्येही चिनी बनावटीच्या हातमाग व यंत्रमागांच्या वापरावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनांनी जाहीर केला आहे. प्रत्यक्षात या शहरांत चिनी यंत्रमागांची संख्या कमीच आहे. हे माग काहीसे स्वस्त असले तरी ते टिकाऊ नसतात आणि त्यांच्या देखभालीसाठी अधिक खर्च येत असल्यामुळे त्यांचा वापर कमी होत आहे.सोलापुरात पुढाकारसोलापूरच्या यंत्रमाग उद्योगात चिनी बनावटीचे माग व सुटे भाग वापरले जातात. या यंत्रसामग्रीवर बहिष्कार घालण्यासाठी येथे यंत्रमागधारक संघ आणि टेक्सटाइल डेव्हलपमेंट फाउण्डेशन या संघटनांनी पुढाकार घेतला आहे. सोलापुरातील यंत्रमाग कारखान्यांमध्ये १५०० अत्याधुनिक माग आहेत. त्यापैकी १२०० माग चिनी बनावटीचे आहेत, शिवाय यंत्रांचे सुटे भागही चिनीच असतात. चिनी यंत्रसामग्रीचा वापर ७५ टक्के होतो. येथील उद्योगावर चीनचा मोठा प्रभाव असला तरी त्या देशातील तंत्रज्ञान टिकाऊ नाही. चिनी यंत्रमाग तुलनेने स्वस्त असले तरी त्यांचे आयुष्य १० ते १५ वर्षेच असते आणि दुरुस्तीचा खर्चही मोठा असल्याचे उद्योजकांनी सांगितले.भिवंडीत बंदीचभिवंडी भारतातील कापड उद्योगाचे माहेरघर म्हणून भिवंडी शहर देशभर प्रसिद्ध आहे. कापडाची निर्मिती व व्यापार मोठ्या प्रमाणात असल्याने भिवंडीत यंत्रमाग व्यवसाय वाढला होता. आता तो डबघाईला आला आहे. चिनी बनावटीचे यंत्रमाग भिवंडीत आले. कमी मजुरांच्या उपलब्धतेत ही यंत्रे मोठे काम करणारी होती. मात्र सततच्या बिघाडामुळे चिनी बनावटीची यंत्रे काही दिवसांतच हद्दपार झाली. आणि व्यापाऱ्यांनी जुने यंत्रमाग पुन्हा सुरू केले. त्यामुळे सध्या येथे चिनी यंत्रमाग येतच नाहीत. बहुसंख्य यंत्रमाग मजूर परप्रांतातील आपल्या मूळगावी गेल्याने सध्या मजुरांअभावी येथील यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात बंदच आहे.मालेगावात परंपरागत यंत्रमागमालेगाव शहरात परंपरागत जुनेच यंत्रमाग असून, त्यावर दर्जेदार कापड निर्मिती होते. केवळ २०० ते २५० यंत्रमाग चिनी बनावटीचे असून, त्यातून दर्जेदार कापड निर्मिती झाली नाही. चिनी यंत्रमागातून दर्जेदार कापड निर्माण होऊन त्याची निर्यात होईल, असे वाटले होते; परंतु अपेक्षा फोल ठरल्याचे यंत्रमागधारक महेश पाटोदिया यांनी सांगितले.शहरातील चाळीसगाव फाट्यावर एका कारखानदाराकडे चिनी बनावटीचे यंत्रमाग आहेत. ते यंत्रमाग तकलादू असल्याची तक्रार आहे. शहरात अनेक उद्योजक चिनीऐवजी परंपरागत जुन्याच यंत्रमागावर व्यवसाय करीत आहेत. चिनी यंत्रमागांचा वेग कमी असतो. देखभालीसाठी जास्त खर्च लागतो. यामुळे शहरातील यंत्रमागधारकांनी चीनऐवजी जर्मनीतून यंत्रसामग्री मागविली आहे. बेडशिटसह हेवी कापड उत्पादनासाठी चिनी यंत्रमाग चालू शकत नाही, असे यंत्रमाग उद्योजक शेखर भामरे यांनी सांगितले.>स्वदेशीचा बुलंद नाराचिनी यंत्रमाग स्वस्त असल्यामुळे सोलापुरातील यंत्रमागधारकांनी आधुनिकीकरण करताना चिनी यंत्रमागांना पसंती दिली; पण त्यांचा टिकाऊपणा कमी असल्यामुळे निराशा झाली. आता चीनने सुरू केलेल्या कुरापतींमुळे येथील उद्योगात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या स्थितीत आम्ही चिनी वस्तूंच्या बहिष्कारासाठी जनजागरण करणार आहोत.- राजेश गोसकी, अध्यक्ष, यंत्रमाग डेव्हलपमेंट फाऊंडेशन, सोलापूर>इचलकरंजीचीही तयारीइचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योगासाठी चिनी बनावटीचे यंत्रमाग मागवणेही बंद करण्याचा पवित्रा कारखानदारांनी घेतला आहे. शहरामध्ये सुमारे तीन हजार चिनी बनावटीचे यंत्रमाग आहेत. वस्त्रोद्योगातील बिकट परिस्थितीमुळे सध्या कोणत्याच यंत्रमागांना नव्याने मागणी नाही. परंतु चीनबरोबरचे संबंध बिघडल्यामुळे चीनचे यंत्रमाग खरेदी करणेही बंद करण्याचा पवित्रा येथील उद्योजकांनी घेतला आहे.