संतोष ठाकूर
नवी दिल्ली : विमानप्रवासातही मोबाइलचा वापर करता यावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी एप्रिल-मे महिन्यानंतर पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. विस्तारा ७८७ प्रकारच्या विमानात ही सेवा मार्च-एप्रिलपर्यंत सुरु होऊ शकते. या सेवेसाठी नेल्कोसोबत करार केला आहे. यासाठी कंपनी पॅनासॉनिकचे तांत्रिक सहाय्य घेणार आहे. यात ४ ते ५ तासांच्या प्रवासात व्हॉटसअॅप, फेसबुक आणि मेसेजिंगसाठी ३०० ते ३५० रुपयांचे शुल्क तर लाइव्ह क्रिकेट तसेच लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी १५०० ते १८०० रुपये आकारले जाऊ शकतात. परंतु अद्याप याचा निर्णय झालेला नाही.
नेल्कोचे प्रबंध निर्देशक आणि सीईओ पी. जे. नाथ म्हणाले की, यासाठी व्ही-सॅट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच इस्त्रोच्या उपग्रहाचा उपयोग केला जाईल. या सेवेचे संचालन नवी मुंबईतील केंद्रातून केले जाईल. भारतात अशा सेवेच्या बाजारात वर्षाला ५०० ते ६०० कोटींची उलाढाल होऊ शकते. विस्ताराचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विनोद कनन म्हणाले की, नियमित प्रवास करणाऱ्यांना ही सेवा मोफत देण्याचा आमचा विचार आहे. सोशल मीडिया तसेच लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी वेगवेगळी पॅकेजेस दिली जाऊ शकतात.देशांतर्गत मार्गांचाही विचारयेत्या काळात ही सेवा दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, मुंबई-बंगळुरु, दिल्ली-बंगळुरु, दिल्ली-चेन्नई या मार्गांवर सुरु होऊ शकते. या मार्गावर कार्यालयीन कामात व्यग्र असणाºया तसेच ज्यांना सतत आपल्या कार्यालयाशी संपर्कात रहावे लागते, अशा प्रवाशांची संख्या खूप आहे.