हैदराबाद : आयटी क्षेत्रात कर्मचारी संघटनेची गरजच नाही, असे प्रतिपादन आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसच्या एका माजी अधिकाऱ्याने केले आहे. आयटी उद्योगात कार्य नैतिकता चांगली आहे. कर्मचाऱ्यांना भरपूर वेतन मिळते, तसेच कंपनी सोडल्यानंतरही त्यांना भरपूर संधी असतात, त्यामुळे संघटनेची गरज नाही, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
इन्फोसिसचे माजी मुख्य वित्त अधिकारी व्ही. बालकृष्णन यांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा घसरणीचा काळ आला, तेव्हा तेव्हा कर्मचारी संघटना आयटी उद्योगात येत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या; पण या चर्चा कधीच टिकून राहू शकल्या नाहीत. आयटी क्षेत्रातील कार्य नैतिकता चांगली आहे.
वेतन भरपूर आहे. आज नोकरकपातीची एवढी चर्चा होत असतानाही नोकरी सोडून जाण्याचा दर दोन अंकी आहे. कर्मचारी संघटनांची चर्चा नेहमीच होत आली आहे. मात्र, एका ठरावीक टप्प्यानंतर ती विरून जाते. ती कधीच टिकून राहू शकलेली नाही.
बालकृष्णन म्हणाले की, समजा कामगार संघटना आयटी क्षेत्रात आल्या तरी त्यामुळे फार काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. एक तर या क्षेत्रात प्रचंड वेतन आहे आणि दुसरे म्हणजे लोकांना बाहेर संधी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात. कर्मचारी संघटना अशाच उद्योगात यशस्वी होतात, जेथे कार्य नैतिकता वाईट असते, तसेच जेथे कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक मिळते. आयटीमध्ये असा काही प्रकारच नाही.
एखादे वर्ष वाईट ठरल्याने काही होत नाही. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली जात असल्याचा बातम्या अलीकडे आल्या आहेत. भविष्यात आणखीही नोकरकपात होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रात संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न काही लोकांनी सुरू केले आहेत. (वृत्तसंस्था)
आयटी कर्मचाऱ्यांना संघटनेची गरजच नाही
आयटी क्षेत्रात कर्मचारी संघटनेची गरजच नाही, असे प्रतिपादन आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसच्या एका माजी अधिकाऱ्याने
By admin | Published: June 1, 2017 12:41 AM2017-06-01T00:41:29+5:302017-06-01T00:41:29+5:30