लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२०-२१साठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपली आहे. या तारखेनंतर विवरणपत्र भरणाऱ्या व्यक्तींना विलंब शुल्क भरावे लागेल. मात्र, काही उत्पन्न गटातील लोकांना या तारखेनंतरही विलंब शुल्कातून सूट मिळते.
पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना पाच हजारांचे विलंब शुल्क लागते. पाच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांना एक हजाराचे विलंब शुल्क लागते. मात्र, मूळ सूट मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना मुदत संपल्यानंतर प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यानंतरही कोणतेच विलंब शुल्क लागत नाही.
कररचनेनुसार ‘मूळ सूट मर्यादा’ (बेसिक एक्झम्प्शन लिमिट) वेगवेगळी आहे. नव्या कररचनेत (न्यू टॅक्स रेजिम) मूळ सूट मर्यादा सर्व वयोगटांसाठी सरसकट २.५ लाख रुपये आहे. म्हणजेच २.५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना कोणतेही विलंब शुल्क लागणार नाही. .
यांना भरावे लागते विलंब शुल्क
ज्या व्यक्तींच्या एक कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी बँकेत आहेत.
विदेशातील प्रवासासाठी दोन लाख रुपयांपेक्षा अधिकचा खर्च करणाऱ्या व्यक्ती.
एक लाख रुपयांपेक्षा अधिकचे वीजबिल भरणाऱ्या व्यक्ती.