नवी दिल्ली : आयकर विवरण (आयटीआर) भरले नसल्यास तत्काळ पावले उचला. कारण आयटीआर दाखल करण्यासाठी ३१ जुलै हा अखेरचा दिवस आहे. ही मुदत हुकवू नका. आयटीआर भरण्याची मुदत यंदा वाढण्याची शक्यता कमीच आहे. मुदत संपल्यानंतर माेठा भुर्दंड सहन करावा लागू शकताे. आयकर खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा काेटींपेक्षा जास्त करदात्यांनी विवरण दाखल केले आहे. विवरण दाखल करण्यासाठी सातत्याने स्मरण करून दिले जात आहे.
हेल्प डेस्क २४ तास सुरूकरदात्यांच्या मदतीसाठी आयकर खात्याचा हेल्प डेस्क २४ तास काम करीत आहे. शनिवार आणि रविवारीही कर्मचारी कामावर हाेते. आयटीआर दाखल करताना किंवा त्यानंतरच्या अडचणी साेडविण्यासाठी आयकर विभागाचे कर्मचारी हेल्प डेस्कच्या माध्यमातून मदत करीत आहेत.
मुदत हुकल्यानंतर काय हाेणार?
- ३१ जुलैनंतर आयटीआर दाखल करणाऱ्या करदात्यांना विलंब शुल्क भरावे लागेल.
- ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास पाच हजार रुपयांचा शुल्क.
- पाच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास शुल्काची रक्कम एक हजार रुपये असेल.
हे करा
- विवरण भरताना याेग्य आयटीआर अर्ज निवडा.
- नाेकरदार वर्गाचे वेतन, बचत खात्यावरील व्याज, म्युच्युअल फंडाचे लाभांश इत्यादी माध्यमातून हाेणारे उत्पन्न असेल तर आयटीआर-१ भरावा.
- म्युच्युअल फंड किंवा मालमत्ता विक्रीतून कॅपिटल गेन असल्यास आयटीआर-२ निवडावा.
- वजावटी आणि उत्पन्नाची याेग्य माहिती द्या. आयटीआर दाखल केल्यानंतर ताे व्हेरिफाय करणे विसरू नका. अन्यथा रिफंड उशीरा मिळताे. ही प्रक्रिया ऑनलाइनदेखील हाेते.
यूट्युबद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर कर किती?
यूट्युबच्या माध्यमातून उत्पन्न हाेत असल्यास ती करपात्र असते. यासंदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत. आयटीआर दाखल करताना हे उत्पन्न नाेंदविणे आवश्यक आहे.
यूट्युबमधून हाेणारे उत्पन्न तुमच्या उत्पन्नाचा प्रमुख स्राेत असल्यास हे व्यावसायिक उत्पन्न मानले जाईल. त्यावर व्यावसायिक उत्पन्नानुसार कर आकारण्यात येईल.
उत्पन्न कमी असल्यास हे उत्पन्न इतर स्राेतांमार्फत मिळणारे उत्पन्न गृहित धरण्यात येईल. यूट्युबरच्या उत्पन्नाच्या टप्प्यांनुसार कर आकारला जाईल. दाेनपैकी काेणतीही एक रचना स्वीकरण्याचा पर्याय घेता येईल.
अनेकांची डेडलाइन हुकणार
यावेळी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे १४ टक्के लाेकांची डेडलाईन हुकण्याची शक्यता जास्त आहे. काही राज्यांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा, नैसर्गिक संकटांचा या लाेकांना फटका बसू शकताे. या राज्यांमधील लाेकांना आयटीआर भरण्यासाठी दाेन आठवड्याची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे.