नवी दिल्ली : जीएसटीमुळे देशातील अप्रत्यक्ष करांची गुंतागुंत संपली असून गरजेच्या वस्तूंवरील कर कमी झाल्याने नागरिकांना त्याचा फायदा झाल्याचा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. त्यामुळे सरकार आता जीएसटीच्या कररचनेत बदल करुन त्याचे दर आणखी कमी करु शकते, असे जेटलींनी म्हटले आहे.जीएसटीला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी म्हटले आहे की, कर पालनात वृद्धी झाल्याचे दिसत आहे. पहिल्या वर्षीच जीएसटीचा चांगला लाभ आम्ही पाहिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जीएसटी ऐतिहासिक ठरला आहे.यापेक्षाही सकारात्मक परिणाम येणे अद्याप बाकी आहे. देशाच्या जीडीपी विकासावर याचा दीर्घ काळापर्यंत प्रभाव दिसून येईल. ते म्हणाले की, ई वे बील कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे चोरी आणि करचुकवेगिरी शोधता येणार आहे.जेटली म्हणाले, आगाऊ कर भरण्यामुळे एकूण महसुलात फायदा झाला आहे. जीएसटीमुळे भारतात संगठीत बाजाराची निर्मिती झाली आहे. मोदी सरकारच्या काही मोठ्या निर्णयांपैकी हा एक महत्वाचा निर्णय आहे. गेल्या वर्षी १ जुलैपासून आम्ही देशातील गुंतागुंतीची करप्रणाली संपुष्टात आणली. त्यावेळी १३ विविध प्रकारचे कर आणि ५ विविध प्रकारच्या करभरण्याची व्यवस्था होती.करांवर कर लागत होता. प्रत्येक राज्याचे करांचे आपले विभिन्न दर होते. त्यानुसार, करभरणा करावा लागत होता. देशाच्या संघ प्रणालीच्या पद्धती लक्षात घेऊन जीएसटीची कररचना तयार करण्यात आली.जीएसटी म्हणजे धडकी भरविणारा कर : सुरजेवालानवी दिल्ली : जीएसटी म्हणजे धडकी भरविणारा कर आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. त्यांनी व्टिट केले आहे की, व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी हा कर गब्बरसिंग टॅक्स ठरत आहे. सरकारने सिंगल टॅक्स जीएसटीचा शब्द दिला होता. पण, तसे झाले नाही. अनेक नियम, अनेक रिटर्न यामुळे व्यापारी त्रस्त आहेत.समारंभ कशासाठी? : चिदंबरममोदी सरकारने गेल्या चार वर्षांत अनेक वाईट गोष्टी मोठ्या प्रमाणात केल्या व अनेक चांगल्या गोष्टींचे वाईट केले हे माहिती असतानाही हे सरकार जीएसटीला एक वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव कसा साजरा करते हे समजत नाही, असे काँग्रेसने म्हटले.माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, ‘ जीएसटीची अमलबजावणी वाईट पद्धतीनेकेली. जीएसटीची रचना, दर आणि अमलबजावणी अशी काही फसली आहे की जीएसटी हा शब्द व्यावसायिक, व्यापारी, निर्यातदार आणि सामान्य माणसांत बदनाम झाला आहे, असे त्यांनी सांगितले.प्रदीर्घ काळचा फायदा : गोयलजीएसटी लागू करण्याचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी समर्थन करून अर्थव्यवस्थेला त्याचा प्रदीर्घकाळ फायदा होणार असल्याचे म्हटले. जीएसटीच्या पहिल्या वर्धापनदिननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जीएसटी राबवण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सगळ््या राजकीय पक्षांचे आभार मानले. जीएसटीमुळे पारदर्शकता आली असल्याचे ते म्हणाले.९५, ६१० कोटी कर जमाअर्थ सचिव हसमुख अधिया यांनी म्हटले की, जून महिन्यात जीएसटीच्या रुपात ९५ हजार ६१० कोटी रूपये जमा झाले आहेत. मे महिन्यात ९४ हजार १६ कोटी रूपये तर एप्रिल महिन्यात १.०३ लाख कोटी रूपये जमले होते. दरमहा एक लाख कोटी रूपये जमतील अशी आम्हाला आशा असल्याचेही त्यांनी सांगितले. आधीच्या आर्थिक वर्षात महिन्याला सरासरी ८९ हजार ८८५ कोटी रूपये जमा व्हायचे, असे अधिया म्हणाले.
जीएसटीचा दर आणखी कमी करणार, जेटलींनी दिले संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:04 AM