करनीती भाग १६६ - सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनीक पात्र) : कृष्णा, यंदाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली दिनांक १ फेबु्रवारीला सादर करतील. या अर्थसंकल्पाची देशवासी अतुरतेने वाट बघत आहे. निवडणुकींचे कारण, नोटाबंदी, इ. अडचणीतून हा अर्थसंकल्प जाणार आहे. जसे जलिकट्टूसारखे या बजेटचे झाले आहे, असे वाटते. महागाईच्या बैलाला कसे रोखले जाणार व बजेटचे महत्त्व काय ?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : खरेच बजेट आणि जलीकट्टू यांत गमतीदार समानता आहेत. सैराट झालेल्या बैलाला आवरणे सोपे नाही. कर संकलन, शासकीय खर्च नोटबंदी इत्यादीच्या झटक्याने अर्थव्यवस्थेच्या बैलाला सारवणे हे बजेटचे सर्वात अवघड काम. सरळ सोप्या भाषेत बजेट म्हणजे पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजित उत्पन्न व खर्च यांचे बनविलेले पत्रक. या पत्रकाआधारे शासनाचे कार्य केले जाते. म्हणजेच अंदाजित ठरलेले उत्पन्न किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात, तसेच जेवढा अंदाजित खर्च केला पाहिजे, त्यापर्यंतच खर्च होईल, याची योजना आखली जाते. अर्जुना, सर्वसाधारण व्यक्ती कोणतीही गोष्ट खरेदी करायला जातो, तेव्हा ती आपल्या बजेटमध्ये बसते की नाही, हे तपासून घेतो. या सर्व जमा व खर्चाची मासिक किंवा वार्षिक गोळाबेरीज म्हणजे बजेट. जलिकट्टू बैलाला सावरण्यास दुखापत होऊ शकते, तसेच बजेट तयार करताना अनेक दुखावलेल्या क्षेत्रांना आर्थिक मदत देऊन सावरावे लागते.
अर्जुन : कृष्णा, बजेटचे प्रकार कोणते आहेत व त्याचे महत्त्व काय?
कृष्ण : अर्जुना, जसे जलिकट्टूची तयारी अनेक जण करतात, तसे पाहिल्यास बजेट लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत, घरापासून ते देशापर्यंत, नफा कमविणाऱ्या सर्व व्यवसाय करणाऱ्यापासून ते समाजसेवा करणाऱ्या, नफा न कमविणाऱ्या सर्व संस्था बजेट तयार करतात, तसेच त्यांच्या वापरण्याच्या प्रकारावरून त्याचे विविध प्रकार केले आहेत. उदा. वैयक्तिक बजेट, झीरो बजेट, परफॉर्मन्स बजेट, रेव्हेन्यू बजेट, कॅपिटल बजेट, कॅश बजेट इ. या प्रकारातून मुख्य तीन भाग बजेटचे आपण करू शकतो, ते म्हणजे फॅमिली बजेट, धंदा किंवा व्यवसायाचे बजेट, देशाचे किंवा राज्याचे बजेट.
अर्जुन : कृष्णा, प्रत्येकाने फॅमिली बजेट का बनवावे ?
कृष्ण : अर्जुना, प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन खर्च, आकस्मिक होणाऱ्या खर्चासाठी नियोजन, घरामध्ये मोठी वस्तू घेण्यासाठीचा खर्च, मुलांचा खर्च, गुंतवणूक, विम्यावरील खर्च इ.एम.आय. इ. खर्चाची तरतूद व नियोजन करावे लागते, तसेच बदलेली जीवनशैली तसे हॉटेलिंग, हॉस्पिटलचा वाढणारा खर्च, आकस्मित होणारे अपघात वगैरे यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक नियोजनाची खूप मोठी जबाबदारी आहे. यासाठी बजेट हे एकमेव साधन आहे. प्रत्येक कुटुंबाने राहणीमानानुसार उत्पन्नाच्या स्रोतानुसार व खर्चाच्या अनुमानाचा वेध घेऊन बजेट बनवायला हवे. मासिक बजेट तयार करायला हवे. प्रत्येक महिन्याच्या अखेर त्या महिन्याचे अनुमानित बजेट व प्रत्यक्ष झालेला खर्च तपासावा व त्यानुसारच पुढील महिन्याच्या बजेटमध्ये फेरफार करावा. यामुळे उत्पन्न व खर्च याचा समतोल बसविता येऊ शकेल. यामुळे आर्थिक नियोजन होईल व घरांत शांतता नांदू शकेल, तसेच मुलांनाही शिस्तीचे व काटकसरीचे संस्कार याद्वारे मिळतील. महागाईच्या बैलाला घरापासूनच शिस्तीत ठेवले तर ते आटोक्यात राहते, म्हणूनच म्हणतात की, खर्च नेहमीच नियंत्रणात असावेत.
अर्जुन : व्यवसायाच्या बजेटचे काय महत्त्व?
कृष्ण : प्रत्येक व्यवसाय करणाऱ्याला दूरदर्शी, आपले ध्येय साध्य करण्यास बजेट तयार करणे आवश्यक आहे. प्रगती करावयाची असल्यास टार्गेट ठरवावे लागतात. ते साध्य करण्यासाठी उपाय योजावे लागतात. बजेटमागील वर्षाच्या उलाढाली, खर्च, नफा इ. लक्षात घेऊन तयार केले जाते. व्यवसाय म्हटला की, भांडवल लागतेच. त्यासोबत बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. यासाठी पुढील वर्षासाठी अंदाजित बजेट तयार करवून द्यावे लागते, तसेच नवीन युनिट, शाखा सुरू करावयाची असल्यास, त्याचे बजेट तयार करून क्षमता तपासली जाते. छोटे दुकानदार किंवा व्यावसायिक पुढील वर्षाचे बजेट तयार करून आपले ध्येय, टार्गेट प्राप्त करण्यासाठी उपाय करू शकतात, तसेच खर्चावर नियंत्रण ठेवू शकतात. मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या विभागानुसार व टार्गेटनुसार बजेट तयार करून सर्व कर्मचाऱ्यांना त्यानुसार काम देऊन त्यांना टार्गेट साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करतात.
अर्जुन : कृष्णा, आता आपल्या देशाचे बजेट कसे व कोणत्या बाबींचा, गोष्टीचा विचार करून तयार केले जाते हे सांग?
कृष्ण : अर्जुना, २०१७च्या बजेटचे दोन वैशिष्ट्ये आहेत. एक या वेळी रेल्वेचा अर्थसंकल्पही यातच समाविष्ट आहे, दुसरे ते २८ फेब्रुवारीऐवजी १ फेबु्रवारीला प्रस्तुत होणार आहे. अर्थसंकल्प तयार करताना देशांतील अनेक नामवंत संस्था, व्यक्ती, अर्थशास्त्री, शासकीय विभाग इ. अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी करायला हव्या, याचा उहापोह, चर्चा, करतात व योजना आखल्या जातात. बजेट तयार करण्यास अर्थमंत्रालयात एक स्वतंत्र विभाग आहे. जेव्हा बजेटचे प्रिटिंग केले जाते, तेव्हा संबंधित अधिकारी वर्ग व बजेट तयार करणारे संबंधित व्यक्तिंना अज्ञात ठिकाणी पाठवले जाते. बजेटमध्ये उत्पन्न व खर्च असे दोन प्रकार आहेत. उत्पन्न करदात्याकडून कर स्वरूपात सरकारला मिळालेल व खर्च म्हणजे देशाच्या विकासासाठी व देशाचा कारभार चालविण्यास निरनिराळ्या विभागांना दिलेले पैसे. बजेटमध्ये कर कायद्यातील अपेक्षित बदल दिले जातात व अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करतात. यालाच ‘फायनान्स बील’ म्हणून संबोधले जाते. या अर्थसंकल्पावर लोकसभा व राज्यसभेमध्ये सखोल चर्चा करून योग्य सूचनांचा अवलंब झाल्यावर, माननीय राष्ट्रपतींच्या सही करून पारीत होते व त्यानुसार, कर कायद्यामध्ये बदल होतो व त्यानुसार ते अंमलात येतात.
नोटाबंदीद्वारे उधळलेला आर्थिक बैल कसा आटोक्यात येईल?
जलिकट्टूचा खेळ कसा आहे, हे प्रत्येकाने स्वत:च पारखावे, परंतु प्रत्येकाने बजेटमध्ये राहावे, म्हणजेच संतुलित जीवन जगणे. याचा अर्थ असा की, प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसारच पैसा खर्च करावा. उत्पन्न पाहूनच संसार वा व्यवसाय चालवावा. कर्जाचे प्रमाण सिमीतच ठेवावे, अन्यथा आर्थिक कटकटी होतील. घर, व्यवसाय आणि देश चालविण्यासाठी बजेट हा एक उत्तम पर्याय आहे. आजकाल व्यक्ती देशाच्या बजेटची चिंता करतो, तसेच व्यवसायाच्या बजेटची चिंता करतो आणि फॅमिलीचे बजेट विसरून जातो. सर्वात महत्त्वाचे बजेट म्हणजे, फॅमिली बजेट होय. कारण ते आपल्या हातात आहे, व्यवसायाचे बजेट हे दुसऱ्याच्याही हातात आहे आणि देशाचे बजेट हे शासनाच्या हातात आहे. स्वत:मध्ये सुधारणा केल्यास देशाची सुधारणा होईल. जीएसटी, आयकर, बँकिंग, कॅशलेस व्यवहार, निवडणूक इ. अडचणींतून नोटाबंदीद्वारे उधळलेला आर्थिक बैल कसा आटोक्यात येईल हे पाहू या!