Join us

कोट्यवधी जनधन खातेधारकांना आता मिळणार ही सुविधा, सरकारची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 4:26 PM

पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँकांमध्ये आतापर्यंत 35.99 कोटी खाती उघडण्यात आली आहेत.

नवी दिल्लीः पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँकांमध्ये आतापर्यंत 35.99 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. त्यातील 29.54 कोटी खाती अकार्यान्वित आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी एका प्रश्नाला राज्यसभेत लिखित उत्तर देताना ही माहिती दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात जनधन खाते असणाऱ्या महिलांना ओव्हर ड्राफ्टची सुविधा देणार असल्याचं सांगितलं होतं. ज्या महिला सेल्प हेल्प ग्रुपच्या सदस्य आहेत, त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासुविधेमुळे महिलांना छोटे व्यवसाय करण्यासाठी मदत मिळणार आहे. ओव्हरड्राफ्ट म्हणजेच खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे. या योजनेंतर्गत खातेधारकांना 10 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळत आहे. तत्पूर्वी या सुविधेंतर्गत 5 हजार रुपये काढता येत होते. जनधन योजनेंतर्गत खासगी बँकांमध्ये खाती उघडण्याचीही सरकारनं परवानगी दिलेली आहे.मिळालेल्या माहितीनुसार खासगी बँकांमध्ये आतापर्यंत 1.23 खाती उघडण्यात आली आहेत. सरकारी आकड्यांनुसार जनधन खात्यात एकूण जमा असलेल्या रकमेत वारंवार वाढ होत आहे. ही रक्कम 3 एप्रिलपर्यंत 97,665.66 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एकूण खात्यांपैकी 50 टक्के खाती ही महिलांच्या नावे आहेत.केंद्र सरकार महिलांसाठी नारी तू नारायणी योजनाही आणणार आहे. तसेच याअंतर्गत एक समितीही तयार केली जाणार असून, देशाचा विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. उज्ज्वला योजनेमुळे महिलांची धुरापासून सुटका झाल्याचंही केंद्रानं अधोरेखित केलं आहे.