Join us

भारीच! आठवड्याचे सातही दिवस अन् 24 तास करता येणार बँकेची कामं; जाणून घ्या नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 5:43 PM

Digital Banking Units : जनधन खात्यानंतर आता 24 तास लोकांना बँकिंग सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

नवी दिल्ली - प्रत्येक व्यक्तीपर्यंत बँकिंग सेवा पोहचवण्यासाठी देशात जोरदार तयारी सुरू आहे. जनधन खात्यानंतर आता 24 तास लोकांना बँकिंग सुविधांचा लाभ घेता येणार आहे. बँका आता आठवड्याचे सातही दिवस आणि चोवीस तास सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँक युनिट्स अर्थात DBU उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता DBU साठी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. आरबीआयने जारी केलेल्या गाईडलाईन्स देशातील सर्व व्यावसायिक बँकांना लागू असणार आहेत. यामध्ये ग्रामीण बँक, पेमेंटस बँक आणि लोकल बँक यांचा समावेश असणार नाही. 

डिजिटल बँकिंग युनिट्स म्हणजे नेमकं काय आणि त्याचा फायदा कोणाला होणार हे जाणून घेऊया. आरबीआयने DBU साठी आपल्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. डिझाईन आणि फॉरमॅटचा विचार करता डीबीयू हे सर्वसामान्य बँकेसारखे नसतील. त्याचं डिझाईन विशिष्ट प्रकारचं असतं. प्रामुख्याने डिजिटल बँकिंग युजर्ससाठीच्या सेवांचा लाभ मिळेल असं सांगितलं जातं आहे. मिळालेल्य़ा माहितीनुसार, प्रत्येक बँकेला स्मार्ट उपकरणं लावावी लागणार आहेत. 

इंट्रॅक्टिव टेलर मशीन, इंट्रॅक्टिव बँकर, सर्व्हिस टर्मिनल, टेलर, कॅश रिसायकलर्स इंट्रॅक्टिल डि़जिटल वॉच यांचा समावेश आहे. तसेच डॉक्युमेंटस अपलोडिंग, सेल्फ सर्व्हिस कार्ड जारी करणारी मशीन, व्हिडीओ केवायसीची उपकरणं डिजिटल बँकिंग युनिट्समध्ये असतील. याला डिजिटल आणि ह्युमन टच असेल. तसेच युजर्सला बँकेसारखी प्रत्येक सुविधा मिळेल. 

डिजिटल बँकिंग युनिट्समध्ये ग्राहक हे स्वत:च स्वत:चं खातं उघडू शकणार आहेत. तसेच बँकिंगशी संबंधित सर्व कामं ग्राहक स्वत: करू शकतील. सेल्फ सर्व्हिससोबतच या डीबीयूमध्ये कर्मचारी देखील असतील. जे लोकांना मदत करतील. एखादी गोष्ट कळाली नाही तर ती समजून सांगण्यासाठी हे कर्मचारी मदत करणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :बँक